
तहसीलदार देवराव कारगुडे यांच्या पथकाची कामगिरी, टिप्पर सेनगाव पोलिसांच्या हवाली
—————
वसमत :
—————
सेनगाव तालुक्यातील बन शिवारात महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी ता. १७ पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वाहनांची तपासणी करून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले. सदर टिप्पर जप्त करून सेनगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याचे महसूल विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली जिल्हयातील वाळूघाटावरून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागासोबतच पोलिस विभागाच्या पथकांनाही सक्रिय केले. वाळू घाटाच्या मार्गावर गस्त घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाभरात महसूल विभागाचे पथक दिवस रात्र गस्त घालत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सेनगाव तालुक्यातील बन शिवारातील वाळू घाटावरून एका टिप्परमधून वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार देवराव कारगुडे, मंडळ अधिकारी दंडीमे, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप इंगोले, अनिल महिंद्रकर, नामदेव ढोले, ज्ञानेश्वर खेलबाडे, राजू सावंत यांंच्या पथकाने आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास बन शिवारात जाऊन वाहनांची तपासणी सुुरु केली. यामध्ये वाळूचे एक टिप्पर या पथकाने थांबविले. पथकाने चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही.
या प्रकारामुळे महसूलच्या पथकाने टिप्पर जप्त करून सेनगाव पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई केली जात असल्याचे महसूल विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी कठोर पावले ः तहसीलदार देवराव कारगुडे
तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज असून, पुढील काळातही अशा अवैध वाहतुकीविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.”नागरिकांनी अशा अवैध वाळू उपसा व वाहतुकीची माहिती प्रशासनाला दिल्यास, तात्काळ कारवाई करण्यात येईल
