वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल, जवाहर कॉलनीतील घटना…
——————
प्रतिनिधी :
——————
शहरातील जवाहर कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९ लाख ५९ हजार ४३७ रुपयांचे कपाटातील सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी ता.२६ मध्यरात्री घडली. याबाबत वसमत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध सोमवारी ता.२७ रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जवाहर कॉलनीमध्ये पत्रकार शेख नसीब शेख हबीब यांचे घर आहे. शेख नसीब हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून नांदेड येथे गेले होते. दरम्यान, पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच घराच्या टेरीस्टवरील दरवाजा उघडून आतमध्ये असलेलेले कपाट फोडून आतमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने काढून घेतले. यामध्ये एक ४ ग्राम सोन्याची अंगठी २२००० रुपये, अडीच ग्राम सोन्याची अंगठी १५४७० रुपये, साडेतीन ग्राम सोन्याची अंगठी १८५४० रुपये, एक तोळा सोन्याची रिंग ५९५०० रुपये, २ तोळे ५ ग्राम गळ्यातील सोन्याची चैन ७५८०० रुपये, पायातील चांदीचे चैन १२ ग्राम १५२०० रुपये, अडीच ग्राम सोन्याचे रिंग १७७९० रुपये, ४ ग्राम सोन्याची अंगठी २६००० रुपये, १७ तोळयाचा सोन्याचा राणीहार ६,५३,१३७ रुपये, ३ तोळे सोन्याचा गलसर ५६००० रुपये असा एकुण ९,५९,४३७ रुपयांचा सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
शेख नसीब हे नांदेड येथून घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले निदर्शनास आले. त्यांनी घरात पाहिले असता कपाट तोडून आतील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. कपाटातील दागिने पाहिले असता तेही गायब दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्यात कळवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. शेख नसीब शेख हबीब यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता.२७ रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


