
पांडुरंग पावल्याचा आनंद..पण..जीवाचे रान करणारा पांडुरंग नसल्याचे दुःख…
——————-
प्रतिनिधी :
——————-
रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सीए परीक्षेचा निकाल लागला अन् मी उत्तीर्ण झालो. एकीकडे पांडुरंग पावल्याचा अतिव आनंद होता तर दुसरीकडे हा आनंद पाहण्यासाठी शेतात काबाडकष्ट करुन जीवाचे रान करणारा माझा पांडूरंग (वडील) नसल्याचे दुःख ही तेवढेच होते. वसमत येथे सालगडी आईवडील असलेल्या अंकुश तळेकर या तरुणाची ही यशोगाथा असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. जीवनात आलेली संकटे, अपयश हेच ध्येयाला बळकटी देत असते आणि त्यातूनच यशाला गवसणी घालता येते हेच अंकुश तळेकर यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
मुळ गाव पाचेगाव ता. जिंतूर येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले विलासराव तळेकर यांनी केवळ मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून वसमत गाठले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एक मुलगा , एक मुलगी व पती पत्नी असा चार माणसांचा परीवार चालवण्यासाठी त्यांनी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास सुरुवात केली. मुलाने शिकुन मोठं व्हाव हे विलासरावांच स्वप्न शेतात काबिडकष्ट करताना त्यांना थकू देत नव्हतं. मुलगा अंकुश तळेकर याने पहिली ते चौथी शेताला लागून असलेल्या मोहगाव जिल्हा परिषद शाळेत तर पाचवी ते दहावी विवेक वर्धिनी शाळेत शिक्षण झाले. यानंतर महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी बहिर्जी स्मारक महाविद्यालयात प्रवेश घेतला. या वेळी अंकुश यांची विज्ञान शाखा घेण्याची इच्छा होती परंतू विज्ञान शाखत अभ्यासक्रम पुर्ण करताना खर्च जास्त येत असल्याने शाखेविषयी संभ्रम होता. या वेळी प्रा नवनाथ लोखंडे यांनी वाणिज्य शाखेत खर्च कमी येत असल्याने वाणिज्य पदवी घेऊन सीए ची तयारी कर असा सल्ला दिला. त्यानुसार मी डोळयासमोर सीए होण्याचे स्वप्न घेऊन तयारीला लागलो. काम करीत शिक्षण घेता यावं यासाठी थेट पुणे गाठलं. दिवसभर काम करुन नाईट काँलेज असलेल्या सरस्वती विद्यामंदिर येथे पदवीचे शिक्षण घेतले. या काळात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मित्रांनी एका पक्षाच्या कार्यालयात रात्री झोपण्याची व्यवस्था केली. तसेच गावाकडून आई शेतमजुरी मधून मिळवलेले पैसे पाठवत असे. तसेच चुलते कैलास गोरसे यांनी मोलाची मदत केली. पदविच्या तिसर्या वर्षात असताना सीए फाऊंडेशनची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर इंटरमिजिएट परीक्षेत तिसर्या प्रयत्नात यश आल्यानंतर पुढील तीन वर्ष खाजगी कंपनीत इंटरशिप केली. मुख्य परीक्षेत तीन वेळा अपयश आले. डोळ्यासमोर आईवडीलांचे स्वप्न असल्याने जिद्दीने तयारी सुरु ठेवली. २ में २०२५ रोजी चौथीवेळेस मुख्य परीक्षा होती. मात्र येथेही ईश्वराने अंकुश यांच्या संयमाची परीक्षा घेतली. परीक्षेच्या १० दिवसांपूर्वी वडील विलासराव तळेकर यांचे निधन झाले. अचानक वडील गेल्याचे मोठे दुःख असताना मनाला कठोर केले आणि परीक्षा दिली.
रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी परीक्षेत निकाल आला. यात अंकुश तळेकर याने सीए पदवी मिळवत बाजी मारली. अंकुश व आईच्या आनंदाला सीमा राहिल्या नव्हत्या. मात्र दुसरीकडे मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र शेतात काबाडकष्ट करून उराशी स्वप्श बाळगलेले पांडुरंग (वडील ) या आनंदात सहभागी नसल्याचे दुःख अंकुश आणि त्यांची आई यांच्या चेहर्यावर दिसू लागले. अंकुश तळेकर यांनी सीए परीक्षेत यश मिळवल्यानंतर मित्रमंडळी, प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांना घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच विवेक वर्धिनी शाळेत संस्था व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी व पालकांसाठी अंकुश तळेकर यांचा यश मंत्र…
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागते असे नाही. ज्या मुलांना आई-वडीलांकडून सर्व सुविधा मिळतात. त्यांनी त्याचा योग्य फायदा घ्यावा. यश, अपयश हा प्रयत्न करणारांचा भाग आहे. अपयश आलं तरी संयम कायम ठेवा पुढच्या प्रयत्नात यश नक्की मिळेल. पालकांनी सुध्दा मुलांवर स्वतहा चे निर्णय लादू नये. त्यांना ज्या क्षेत्रात रस असेल तिथे आपलं पाठबळ उभं करावं.
