हिंगोली स्थानिक गुना शाखेची कामगिरी….
——————-
प्रतिनिधी :
——————-
तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यांत घरफोड्या करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीने अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरुपती नगर परिसरात घरफोडीची घटना घडली होती. या घटनेचा तात्काळ उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक मोहन भोसलें यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सय्यद सोहेल सय्यद सत्तार (वय ३१, रा. बल्लागुडा, मुस्तफा हिल्स लँडमार्क मोहम्मद नगर, हैदराबाद.तेलंगणा) याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले ५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण २,२८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसलें तसेच पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
अंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश करून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


