
पेनगंगा नदीत 14963 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू, इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाची माहिती
———————-
प्रतिनिधी :
———————
आज पहाटे तीन वाजल्यापासून ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार स्वरुपात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जयपूर बंधा-याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यानुषंगाने येणारा येवा लक्षात घेऊन १६ ते ३१ ऑगस्ट २०२५ साठी मंजूर द्वार प्रचालनानुसार धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त पाणी ईसापूर धरणाच्या सांडव्याची ९ वक्र द्वारे ५० सेंटीमीटरने उचलून शनिवार ता .१६ पैनगंगा नदी पात्रात १४९६३ क्यूसेक्सचा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्याची माहिती इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे. पैनगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे सकाळी तीन वाजल्यापासून इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. परिणामी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत धरण ९६.४४ टक्के भरले आहे. त्यामुळे धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी इसापूर धरणाच्या सांडव्याची ९ वक्र द्वारे शनिवारी ५० सेंटीमीटरने टप्प्याटप्प्याने उचलण्यात आली आहेत. सकाळी ९ वाजता ३ वक्राद्वारे उचलून ४९८१ इतका विसर्ग सोडण्यात आला . त्यानंतर सकाळी १० वाजता पुन्हा २ वक्रद्वारे उचलून ५ वक्राद्वारे ८३१३ क्यूसेक्सचा विसर्ग सुरू केला. त्यानंतर सकाळी ११ वाजता पुन्हा २ वक्रद्वारे उचलून ७ वक्राद्वारे ११६३८ क्यूसेक्सचा विसर्ग सुरु केला असून दुपारी पुन्हा २ वक्रद्वारे उचलून १४९६३ क्यूसेक्सचा विसर्ग सुरू करुन धरणातील अतिरिक्त पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मागील सकाळी ६ ते दुपारी १२ या सहा तासांत १२.०१३१ दलघमी पाण्याची आवक धरणात आली आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. नदी काठावरील व पूरामुळे बाधीत होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेऊन सतर्क राहावे असे आवाहन इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
