
वसमत मध्ये विश्व हिंदू परिषदेची प्रशासनाकडे मागणी…
वसमत,ता.६
वसमत शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या झेंडा चौक ते मामा चौक रस्त्यावरील रहदारीस अडथळा होत असल्याने सदरील रस्ता तात्काळ नो पार्किंग झोन करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी ता.६ तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
झेंडा चौक ते मामा चौक हा रस्ता वसमत शहरातील प्रमुख बाजारपेठेचा रस्ता आहे.या रस्त्यावरुन महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलं व तालुकाभरातून खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरीकांची वर्दळ असते.या रस्त्यावर कापड व रेडीमेडची मोठी दुकाने आहेत. मात्र समोर वाहन पार्किंगची कोणतीच व्यवस्था नाही. परिणामी आलेले ग्राहक हे दुकानासमोर सार्वजनिक रस्त्यावर वाहने पार्क करतात. यामुळे वाहतूकीची कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे पायी चालणार्या नागरीकांना गर्दी मधून वाट शोधणे धोकादायक व अडचणींचे झाले आहे. अशा वेळेस एखादी अप्रिय घटना घडल्यास पोलीस , रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकत नाही. भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास संबंधित दुकानदार कारणीभूत ठरतील.त्यामुळे स्वतहाची पार्किंग व्यवस्था नसलेल्या दुकानदारांचे परवाने रद्द करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रकाश शहाने, सोपान काळे,साईनाथ पतंगे, नरेंद्र सातपुते,सुभाष अंभोरे,दत्ता निंबाळकर,प्रल्हाद पटवे, दशरथ मज्जनवार, नागेश शंकेवार, संजय एरंडे,नंदू परदेशी, राजू कदम, सुभाष शिंदे,गिरीष देशमुख,नामदेव शिंदे,श्रीनिवास ताटेवार,राजेश भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
