पांगरा शिंदे येथे दुध उत्पादक शेतकरी कर्ज मेळावा संपन्न
——————–
वसमत :
——————–
“दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेत अर्ज करताना आपला नियोजित प्रकल्प तयार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रकल्पामुळे बँकेला कर्ज मंजुरी सोपी होते, तसेच शेतकऱ्याच्या कर्ज परतफेडीबाबत अधिक स्पष्टता येते,” असे मतजिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देत आपले उत्पादन वाढवावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता प्रोत्साहन देत आहेत. तसे शेतकऱ्यांना आवाहनही करत आहेत. या पार्श्वभूमीवर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे आयोजित दूध उत्पादक शेतकरी कर्जमेळाव्यात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे यांनी शेतकऱ्यांना गुरुवारी ता.४ मार्गदर्शन केले.
“ मेळाव्याचे आयोजन स्थानिक दुग्ध संकलन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांना बँक कर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच प्रकल्प लेखनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता स्वतः पुढाकार घेत आहेत. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गायी, म्हशी किंवा शेळ्या खरेदीसाठी बँका कर्ज उपलब्ध करून देतात. मात्र शेतकऱ्यांनी प्रकल्प तयार ठेवणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे यांनी सांगितले.
मेळाव्याला बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरड शहापूर व चौंढी रेल्वे स्टेशन शाखा व्यवस्थापक, तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते. परिसरातील पांगरा शिंदे, लोहरा, वापटी, कुपटी आदी गावांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चेंडके यांनी केले तर संचालन प्रताप शिंदे यांनी केले. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सोपान मारकळ व साईनाथ शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


