
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार, मोफत शिक्षण
——————–
प्रतिनिधी :
——————–
जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी हिंगोली येथे जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी संबंधितांना विभागांना दिले.
जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जागा उपलब्ध करुन देण्याबाबत आढावा बैठक सोमवारी ता.१५ घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, केंद्रीय विद्यालयाचे प्रतिनिधी प्राचार्य अजय चौकीकर, मुख्याध्यापक राम श्रृंगारे उपस्थित होते.
हिंगोली येथे केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे विशेष पुढाकार घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षण मिळावे. स्पर्धेच्या युगात हिंगोली जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, कष्टक-यांची मुले उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन मोठ्या हुद्दयावर पोहचावेत, यासाठी हिंगोलीत हे विद्यालय होणे आवश्यक आहे. केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेसाठी किमान 8 ते 10 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी हिंगोली शहरात जागा उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी तहसीलदारांना सूचना दिल्या.
तसेच याबाबतचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवावा. तसेच केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी तात्पुरती इमारत उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांना यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी निर्देश दिले आहेत .
******
