
वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल, दुर्दैवी घटनेने वसमत मध्ये हळहळ…
——————–
प्रतिनिधी :
——————-
वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर किन्होळा पाटीजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ता. १५ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातातील मयत दोघेही वसमत येथील मंगळवारपेेठ भागातील रहिवासी असून जैन युवा मंचाचे ते सदस्य होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील मंगळवारपेठ भागातील रहिवासी असलेले अंकुश महाजन जैन हा त्याचा मित्र शुभम महाजन याच्यासह दुचाकी वाहनावर आज दुपारच्या सुमारास औंढा नागनाथकडून वसमतकडे निघाला होते. त्यांचे दुचाकी वाहन वसमत पासून काही अंतरावरच असलेल्या किन्होळा पाटीजवळ आली असतांना वसमतकडून औंढा नागनाथकडे जाणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अंकुश महाजन वय ३१ व शुभम महाजन वय २९ हे दोघेही गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार भगवान आडे, रामा लोखंडे, आंबादास विभुते, शहाजी बामणीकर, विजय वऱ्हाडे, विजयकुमार उपरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.
दरम्यान, मयत अंकुश महाजन हा खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चायत दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. तर मयत शुभम महाजन हा खाजगी विमा कंनपीचा एजंट म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही मयतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अंकुश आणि शुभम हे दोघे वसमत येथील जैन युवा मंचाचे सदस्य होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने जैन समाज बांधव व मित्रपरिवार हळहळ व्यक्त करीत आहेत.
