हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेची कार्यवाही, ९ जणांविरुद्ध कुरुंदा पोलिसात गुन्हा दाखल..
——————-
साईनाथ पतंगे :
——————
हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत एकूण ९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २ लाख ७८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी समन्वयाने कारवाई सुरू केली आहे.
दि. २९ मार्च रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुरुंदा हद्दीत अवैध जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक मोहन भोसलें यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी काही जण ‘झन्ना मन्ना’ नावाचा जुगार प्रकार खेळताना आढळले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ९ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ३७ मोबाईल फोन, ४ मोटारसायकली तसेच रोख रक्कम असा एकूण २,७८,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे.
या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांना मोठा धक्का बसला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसलें तसेच त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अमलदार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, शिवाजी जालमीरे, साईनाथ कंठे हरिभाऊ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


