अजय अंबेकर व ज्योती आंबेकर यांनी नाट्यवाचिकेतून उलगडला जीवन प्रवास…
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमतनगरी ही महाराष्ट्राचे विचार वैभव असलेल्या नरहर कुरुंदकर यांची जन्मभूमी. आपल्या भूमी मध्ये जन्मलेला मोठा माणूस म्हणून वसमतकरांना नेहमीच कुरुंदकर या नावाचे आकर्षण राहिलेले आहे. ‘नरहर कुरुंदकर: एका विचारवंताची गोष्ट’ या अजय आंबेकर लिखित नाट्यप्रयोगातून सर्व वसमतकरांनी व विशेषत्वाने नव्या पिढीने भूमीच्या आधारावरच नव्हे तर नरहर कुरुंदकरांना वैचारिक भूमिकांच्या आधारावर समजून घेण्याचा प्रयत्न मंगळवार ता.११ सुरमणी दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात आयोजित नाट्यप्रयोगातून केला आहे.

अजय आंबेकर आणि ज्योती आंबेकर यांनी ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यातील नेमक्या जागा हेरून त्यांचं व्यक्तिमत्त्व या नाट्यवाचनाच्या अभिनव प्रयोगातून प्रेक्षकांसमोर जिवंतपणे उभं केलं आहे. त्यांचे वसमत, हैदराबाद, नांदेड वास्तव्यातील जीवन, त्यांची वैचारिक जडणघडण, व्यक्तिमत्त्वाचे पैलू, बालपण, शिक्षण, विचार, प्रगल्भता, वैयक्तिक जीवन, लग्न यातील प्रसंगातून नरहर कुरुंदकरांचा एक विद्यार्थी, व्यासंगी शिक्षक, प्राचार्य, लेखक, व्याख्याता ते विचारवंत असा प्रवास प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा केला. आजच्या नाजूक अस्मितांच्या काळात समाज स्वास्थ्यासाठी आणि समाजाच्या योग्य दिशेने प्रवास करण्यासाठी कठोर चिकित्सेची कशी गरज असते, हे नरहर कुरुंदकरांच्या सर्व धर्म चिकित्सेतून तसेच त्यांच्या संविधान, आणीबाणीविषयक विचार तसेच महापुरुषांच्या जीवन व कार्यकर्तृत्वालकडे त्यांच्या मर्यादासह पाहण्याची निकोप दृष्टी सामाजिक जडणघडणीसाठी किती आवश्यक असते, हे या नाट्यप्रयोगातून अधोरेखित केले.

सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटी, नांदेडच्या सचिव तसेच नरहर कुरुंदकरांच्या कन्या प्रा सौ शामलताई पत्की, दीपनाथ पत्की, नरहर कुरुंदकर शिक्षण संस्था, कुरुंदाचे सचिव मुंजाजीरावजी इंगोले, श्याम पांडे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच माजी आमदार पंडितराव देशमुख, रामचंद्र बागल, बाळासाहेब महागावकर, सुभाष लालपोतू , कुरुंदकर कुटुंबीय यांच्यासह अनेक मान्यवर तसेच वसमत व कुरुंदा परिसरातील रसिक श्रोते यांची या नाट्यप्रयोगासाठी उपस्थिती लाभली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठानचे प्राध्यापक विशाल पतंगे, नरहर कुरुंदकर शिक्षण संस्था कुरुंदा सर्व कर्मचारी वर्ग, अंकुर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरभद्र बेंडके , दशरथ बापू माचेवार प्रतिष्ठानचे संजय माचेवार, लिटल किंग्स इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्राध्यापक नामदेव दळवी, लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड चे उपाध्यक्ष अरुण आंबेकर, कल्याण कुरुंदकर, सचिव बाळासाहेब बेले, कोषाध्यक्ष संजीव बेंडके, वसमती सांस्कृतिक प्रतिष्ठानचे श्री प्रकाश इंगळे सर, सुनील कबाडे सर, लक्ष्मीकांत जोशी धानोरकर, रंग सभा प्रतिष्ठानचे इब्राहिम भाई आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इंगळे तर आभार प्रदर्शन श्रीमातीअंजली कुरुंदकर यांनी मानले.


