
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत दुसर्या प्रयत्नात यश….
वसमत :
सिव्हिल इंजिनिअरिंग ची पदवी मिळवल्यानंतर कार्पोरेट क्षेत्रात खाजगी नौकरी न स्विकारता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मार्ग निवडून कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता पदाला गवसणी घातली. हे यश मिळवले आहे औंढा तालुक्यातील लोहरा तांडा येथील अश्विनी उत्तम पवार या मुलीने.
लोहरा तांडा येथील उत्तम पवार हे शिक्षक आहेत. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांचा एक मुलगा महावितरण कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहे तर दुसरा मुलगा वैद्यकीय परीक्षेची (नीट) तयारी करीत आहे. मुलगी अश्विनी हिचे प्राथमिक शिक्षण वसमत येथील योगानंद सरस्वती विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षण अहिल्यादेवी होळकर विद्यालयात तर उच्च माध्यमिक शिक्षण नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात झाले. नांदेड येथील एमजीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्थापत्यशास्त्र (सिव्हिल) इंजिनिअरिंग मध्ये पदवी मिळवली. परंतू अश्विनीला खासगी नौकरीत रस नव्हता. प्रशासनात सेवा करण्याची इच्छा असल्याने तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यशाने हुलकावणी दिली मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने तयारी सुरू केली. सेल्फ स्टडी बरोबरच खाजगी आँनलाईन शिकवणीची मदत घेतली आणि या बळावर दुसर्या प्रयत्नात मात्र अश्विनीने बाजी मारली. तीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता पदी निवड झाली आहे. शिकण्याची जिद्द , इच्छा आणि मनातून तळमळ असेल तर यश हमखास मिळते हे अश्विनीने सिध्द करुन दाखवले आहे. अश्विनीने मिळवलेल्या या यशाने लोहरा तांडा आणि हिंगोली जिल्ह्यातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
कष्टाला पर्याय नाही….
प्रयत्न पहिला असो की दुसरा, तिसरा आपण जिंकण्यासाठी लढायचे असते. अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन आणि कष्टाची तयारी ठेवल्यास यश हमखास मिळते असे अश्विनी पवार यांनी शिव सकाळशी बोलताना सांगितले.
