वसमत /
बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेची पर्स कापून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने असलेला डब्बा पळविल्याची घटना वसमतच्या बसस्थानकात शुक्रवारी ता.२ सकाळी ११ च्या सुमारास घडली. त्यामुळे बसस्थानकात कोणतेच संरक्षण नसलेल्या महिला प्रवाशामध्ये भितीचे वातावरण आहे.
याबाबत माहिती अशी की, सध्या लग्नसराईची धूम असल्याने प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. वसमत शहर हे परभणी हिंग़ली व नांदेड जिल्ह्याचे सेंटर पाँइंट असल्याने दळणवळण जास्त प्रमाणात आहे. त्यातच सुरक्षीत प्रवास म्हणून विशेष करुन महिला बसचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. शुक्रवारी परभणी येथील सुमित्रा पिंपरकर ह्या बहिणीच्या लग्नासाठी आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन माहेर गाव असलेल्या वसमत तालुक्यातील सेलू येथे निघाल्या. परभणी येथून वसमत येथे आल्यानंतर वसमत येथून सेलूकडे जाण्यासाठी औंढा बसमध्ये मुलाला घेऊन चढत असताना चोरट्याने गर्दिचा फायदा घेत गळ्यात असलेली पर्स कापून त्यातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने असलेला डब्बा पळवला. चढताना पर्स ताणली गेल्याचे जानवल्यामुळे सुमित्रा पिंपरकर यांनी आपली पर्स तपासली असता ती मध्येच कापलेली दिसली. तसेच आतमधील सोन्याचे दागिने असलेला डब्बा गायब दिसला. यावर घाबरलेल्या सुमित्रा पिंपरकर यांनी जवळील प्रवाशांना दागिने चोरल्याची महिती दिली परंतू चोरटे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले होते. नातेवाईकांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती कळवल्यानंतर बसस्थानक परिसरात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला परंतू चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. शहर प़लिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दोन दिवसांपूर्वीच लाँकर मधून काढले होते दागिने….
सुमित्रा पिंपरकर यांच्या बहिणीचे १० में रोजी लग्न असल्याने त्यांनी बँक लाँकर मध्ये असलेले साडेपाच तोळयाचे सोन्याचे दागिने काढले होते. त्यानंतर त्या माहेरी सेलू गावाकडे निघाल्या होत्या.
गैरसोयीचे स्थानक…
- वसमत बसस्थानकाचे नुतनीकरण होत असल्याचे जुनी इमारत पाडून नविन इमारतीचे काम सुरू केले आहे. मात्र संबंधीत गुत्तेदाराने उभारलेल्या तात्पुरत्या प्रवासी निवार्यात प्रवाशासाठी कोणतीच सुविधा पुर्ण स्वरुपात दिली नाही. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने च़रट्यांचे चांगलेच फावत आहे. तर दुसरीकडे पोलिस चौकी आहे परंतू कायमस्वरुपी पोलिस कर्मचारी बसस्थानकात उपस्थित राहत नाहीत. चौकीचे तोंड बसस्थानकाकडे असण्याऐवजी महामार्गाकडे असल्याने बसस्थानकात काय प्रकार घडतात हे त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नाहीत हे विशेष.
