
वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
—————–
प्रतिनिधी :
—————-
वसमत येथे बेलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला एका महिलेसमोर बनावट सोन्याचे बिस्कीट टाकून अर्धा हिस्सा दे असे म्हणत तिच्या अंगावरील ७६ हजाराचे दागिने पळवून फसवणुक करणाऱ्या तिघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. १७ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तीन आरोपींचा शोध सुरु केला असून त्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील नंदगाव येथील द्रौपदीबाई कांबळे ह्या फडे विक्रीचा व्यवसाय करतात. फडे विक्रीच्या निमित्ताने त्या मंगळवारी ता. १७ दुपारी वसमत शहरात आल्या होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्या बेलेश्वर महादेव मंदिराच्या जवळ आल्या असतांना तीन व्यक्तींनी त्याच्या समोर बनावट सोन्याचे बिस्कीट टाकले. त्या बिस्कीटाकडे द्रौपदीबाई यांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिघांनी आम्ही देखील बिस्कीट पाहिले आहे असे सांगत हे बिस्कीट तुमचेच आहे, मात्र त्यातील अर्धा हिस्सा आम्हाला द्या असे सांगितले.
दरम्यान, त्या तिघांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सोन्याच्या बिस्कीटातील अर्धा हिस्सा कसा द्यायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. यावेळी त्या तिघांनी तुमच्या अंगावरील दगिने दिले तरी चालतील असे सांगितले. त्यावरून द्रौपदीबाई यांनी त्यांच्या अंगावरील चाळीस तोळे वजनाचे चांदीचे दंडकडे व इतर दागिने तसेच सहा ग्राम वजनाचे सोन्याचे कानातले असा ७६ हजाराचा मुद्देमाल त्यांना दिला. त्यानंतर तिघेही निघून गेले.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास द्रौपदाबाई यांनी घरी येऊन त्या बिस्कीटाची पाहणी केली असता ते बिस्कीट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुजेटवरून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
