
शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका….
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमत शहरासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाची यशस्वी धुरा सांभाळलेले ज्येष्ठ नेते डॉ मारोती क्यातमवार यांनी मागील चार दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर त्यांनी वसमत येथे रविवार ता.६ पत्रकार परीषद घेऊन आपली सामाजिक व राजकीय भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपला पक्ष प्रवेश हा केवळ जनसामान्यांच्या विकासासाठी असून आगामी काळात पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास निवडणूक रिंगणात उतरुन दोन हात करण्याची तयारीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना विशद केली.
डॉ मारोती क्यातमवार यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रविवारी वसमत येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजीमंत्री तथा ज्येष्ठ नेते डॉ जयप्रकाश मुंदडा, तालुकाप्रमुख राजु चापके, डॉ मारोती क्यातमवार, उपजिल्हा प्रमुख रामकिशन झुंझूर्डे, विधानसभा प्रमुख मच्छिंद्रनाथ सोळंके, शहरप्रमुख प्रभाकर क्षीरसागर, युवासेना उपजिल्हा प्रमुख बाबा आफुने, युवासेना शहरप्रमुख विनायक सातपुते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ मारोती क्यातमवार यांनी पत्रकारांसमोर आपली पक्षीय भूमिका मांडली. ते म्हणाले की काँग्रेस मध्ये पक्षाकडून किंवा पदाधिकारी, पक्षश्रेष्ठींकडून कुठलाही त्रास नव्हता. केवळ जनसामान्यांच्या विकास कामांना गती यावी, वेळेत गोरगरीबांचे काम व्हावे यासाठी मी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे सांगितले. त्याबरोबरच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता पक्षाने संधी दिल्यास आपण निश्चितच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. पुढील काळात माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा, आमदार संतोष बांगर व तालुका प्रमुख राजु चापके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुक्यात पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा, डॉ मारोती क्यातमवार व राजु चापके यांनी उत्तरे दिली. आभार डॉ मारोती क्यातमवार यांनी मानले.
साहेब आले.. पण..साहेबांचे समर्थक..?
डॉ मारोती क्यातमवार यांनी आपला फार मोठा काळ
काँग्रेस पक्षात घालवला आहे. यादरम्यान त्यांनी विविध सामाजिक, राजकीय उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती जोडल्या आहेत जे नेहमी त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. साहेबांचा प्रवेश झाला आता समर्थकांचा प्रवेश निश्चित आहे पण नेमकं हा धमाका केंव्हा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
