
उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून केली सुरुवात…
———————
प्रतिनिधी :
———————
मराठा आरक्षण यौध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी शुक्रवार ता.२९ मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक रविकिरण वाघमारे यांनी वसमतच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
मराठा समाज आजघडीला आर्थिक डबघाईला आला आहे. भाऊबंदकीमुळे शेतीचे झालेले विभाजन पाहता मराठा समाजाचे आर्थिक जिवनमान फार खालावले आहे. मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासला गेला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी सदरील परिस्थिती आरक्षणासाठी असलेले निकष तंतोतंत लागू होतात. शासनाने मराठा व कुणबी असा भेदभाव न करता वस्तूनिष्ठ स्थितीचा आढावा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
मुंबई येथे मराठा आरक्षण यौध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आमरण उपोषण सुरु केले असून यासाठी संपूर्ण राज्यांमधून गोरगरीब मराठा बांधव आरक्षण लढ्यात उतरला आहे. आंदोलनास मीळत असलेला पाठिंबा पाहता मराठा समाजास आरक्षणाची किती गरज आहे हे लक्षात येते. त्यामुळे न्या. शिंदे समितीच्या अहवालानुसार शासनाने इतिहासकालीन पुरावे व सद्यपरिस्थितीत मराठा समाजाचे आर्थिकदृष्ट्या खालावलेले जीवनमान पाहता मराठा समाजास आरक्षण मिळाणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी नव्याने आरक्षण देण्याची गरज नसून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून जन्मलेल्या आरक्षणास पासून मराठा समाजाला वंचित ठेवता येत नाही. यासाठी शासनाने वेळकाढूपणा न करता तात्काळ मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा असेही रविकिरण वाघमारे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान आमरण उपोषणाला बसलेले रविकिरण वाघमारे यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पतंगे, संजय भोसले पाटील, रामू चव्हाण अक्षय भोसले, शामराव कुरुंदकर यांनी पाठिंबा देत त्यांची भेट घेतली.
