
वसमतला बसवेश्वर मंगल कार्यालयात शिवगणाराधना सोहळा व धर्मसभा संपन्न, वीरशैव लिंगायत समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती…
————————
प्रतिनिधी :
————————
मठ परंपरेत मठ केवळ गुरुंचे निवास नव्हते तर ते पुर्ण गावकऱ्यांचे धर्म, शिक्षण, भक्ती, संस्कार देण्याचे काम करते. एवढेच नाही तर ज्या काळात पोलिस, न्यायालय नव्हते त्या काळात लोकं आपली समस्या मंठा येऊन मांडायचे. या वेळी मठाधिपती गुरु सर्व समस्यांचे निराकरण करुन न्याय देण्याचे काम करीत न्यायाधीशाची भूमिकाही चोख बजवित असल्याचे श्री श्री श्री १००८ श्रीमद् उज्जयिनी सध्दर्म सिंहसिनाधीश्वर जगद्गुरु डॉ सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी शुक्रवार ता.२७ सांगितले.
थोरला मठाचे मठाधिपती लिंगैक्य शिवाचार्यरत्न श्री ष.ब्र. १०८ सदगुरू सांब शिवाचार्य महाराज यांच्या शिवगणाराधना सोहळा निमित्त थोरला मठ संस्थानचे उत्तराधिकारी वेदांतचार्य गुरुवर्य डिगांबर शिवाचार्य महाराज यांच्या वतीने धर्मसभेचे आयोजन वसमत येथील बसवेश्वर मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी गुरुवर्य वेदांतचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेडा, गुरुवर्य नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णा, गुरुवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज मुदखेड, राहीन मठाचे मठाधिपती गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज वसमत, गुरुवर्य सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा, गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज वाळवा, गुरुवर्य महादेव शिवाचार्य महाराज वाई, गुरुवर्य महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरी, गुरुवर्य गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव, गुरुवर्य काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, गुरुवर्य रविशंकर शिवाचार्य महाराज रायपाटन, गुरुवर्य प्रभुलिंग शिवाचार्य महाराज शिरडशहापुर, गुरुवर्य सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेडा, गुरुवर्य शिवचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टी, गुरुवर्य शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव, गुरुवर्य गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव,गुरुवर्य अष्टकौशल्य महंत नागराज गिरी गुरु बाळगिरी महाराज वड गुंफा माहुर, गुरुवर्य मंतय्या स्वामी महाराज थोरावा, रेवनसिध्द गुरु अपरंपार शंभोली आदींची उपस्थिती होती.
यावेळी जगद्गुरु डॉ सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी उपस्थित वीरशैव लिंगायत समाजाच्या
जनसमुदायास मार्गदर्शन करताना मठ परंपरा, गुरुंचे महत्व व कार्य आणि वीरशैव लिंगायत धर्मात गुरु व लिंगाचे महत्व विशद केले. ते मठ परंपरेत बाबत बोलताना म्हणाले की. मठ परंपरा ही अनादिकालापासून आहे. मठ आणि गुरुंच्या माध्यमातून धर्माचा प्रचार, प्रसार, शिक्षण, संस्कार होत असे. केवळ गावात मठ असल्याने गावातील लोकांचा संस्कार, स्वभाव श्रेष्ठ राहत असे. एक गुरु आई-वडिलांचा आशिर्वाद देण्याबरोबरच आचार्य होऊन संस्कार देण्याचे काम करीत होता. त्यामुळे माणसाचा सर्वांगीण विकास करण्यात गुरुंचे मोठे कार्य होते.
शिवाचार्यांच्या कार्याबाबत ते म्हणाले की, देशातील लाखो लोकांना मठाद्वारे उपस्थित होऊन शिवाचार्य रुपात अनादी काळापासून धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गावात देवालय, मठ व मठाधिपती गुरु आवश्यक असल्याचे म्हणाले.
वीरशैव लिंगायत धर्म परंपरेबाबत बोलताना ते म्हणाले की. वीरशैव लिंगायत धर्म परंपरेमध्ये माणसाने गुरुं कडून लिंग धारण करुन दिक्षा घेतल्यानंतरच सद्गती प्राप्त होते. तसेच त्यास सार्थकता प्राप्त होते. बाल्य अवस्थेत संस्कार महत्वाचे असून वीरशैव लिंगायत धर्मात जन्मापुर्वीच संस्कार केले जातात. लिंगैक्य सदगुरू शिवाचार्यरत्न सांब शिवाचार्य महाराज यांच्या बाबत बोलताना ते म्हणाले की सांब शिवाचार्य महाराज हे स्वतहा तपस्वी होते. त्यांनी सदैव आचार्य परंपरेचा प्रचार आणि प्रसार आणि अनुष्ठान करीत तत्पर असत. त्यांचे आचार्य परंपरेत फार मोठे योगदान असल्याचे सांगितले. तत्पूर्वी उपस्थित शिवाचार्य महाराज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी वीरशैव लिंगायत समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
