प्रशासनाकडे भीक मागून मिळवलेले १८३१ रुपये सह तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी…
—————–
प्रतिनिधी :
—————–
मागसवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या मागणीसाठी मंगळवारी ता.१७ सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांनी भीक मागो आंदोलन केले. भीक मागून मिळवलेले १८३१ रुपये व इमारत बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाकडे केली आहे.
मागसवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलां-मुलींच्या वसतिगृहासाठी जमीन खरीदी करिता दिनांक २३ सप्टेंबर २०१४ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग लातूर यांच्या पत्रानुसार 3,9,14000(तीन कोटी नऊ लाख चौदा हजार रुपये) इतका निधी पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत येथील सर्व्हे नंबर 138/1 जलसंपदा विभागाच्या मालकीची असलेल्या जमिनीपैकी 50 आर जमीन खरीदीसाठी उपलब्ध करून दिला होता. परंतु सन २०१८ च्या दराप्रमाणे त्या प्रचलित जमिनीचे मूल्यांकन चार कोटी पाच लाख तेहत्तीस हजार रुपये किंमत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून निश्चित केले होते. परंतु वाढीव रक्कम प्राप्त न झाल्यामुळे सदरचे प्रकरण अद्याप प्रललंबीत आहे, याबाबत सन २०१७ पासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे परंतु या बाबीकडे लोक प्रतिनिधी व प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी सदरचा अखर्चित ३ कोटी ९ लाख १४ हजार रुपयांचा निधी दिनांक ९आक्टोंबर २०१९ रोजी सरकारने वापस घेतला आहे,

सन २०१९ पासून अनेक विकास कामासाठी वसमत तालुक्याला हजारो कोटी रुपये निधी मिळाला परंतु गोरगरिबांच्या लेकराच्या भविष्यासाठी चार-पाच कोटी रुपये उपलब्ध होऊ शकले नाही हे दुर्दैवआहे. त्यामुळे आज मागासवर्गीयांच्या लेकरांना भोरीपगांव शिवारातून उन्हात पावसात , थंडीत दोन ते अडीच किलोमीटर शाळा. कॉलेजात ये-जा करण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाचा सामना करावा लागत आहे, तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या आजूबाजूला अनेक समस्याचे माहेर घर बनले आहे,एकीकडे समाज मंदिर, पुतळे, रस्ते या साठी मोठा गाजावाजा करून निधी उपलब्ध केल्या जातो परंतु या बाबतीत सर्वच मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे मागास वर्गीयांच्या लेकरांना कोणीच वाली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वसतिगृहासाठी जमीन खरीदीस उपलब्ध झालेला निधी सरकारला भीक लागल्यामुळे वापस नेला असल्याचा आनंद खरे यांनी आरोप करीत भिक मागो आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रशासनास दिला होता.
त्यानुसार मंगळवारी ता.१७ सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांनी सर्वजनिक रस्त्यावर, सरकारी कार्यालया समोर, शहरातील मुख्य बाजारपेठेत भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनात त्यांना मिळालेले १८३१ रुपये व इमारत बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाकडे केले आहे.


