
वसमत सर्वसाधारण महिला, हिंगोली इतर मागास प्रवर्ग महिला तर कळमनुरी सर्वसाधारण महिलांसाठी नगराध्यक्ष पद आरक्षित….
——————–
प्रतिनिधी :
——————–
विधानसभा कार्यक्षेत्रात आमदाराच्या पदानंतर नगराध्यक्ष पद प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे शहरावर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षीय नेते आपली शक्ती पणाला लावत असतात. या पदाला गवसणी घालण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बर्याच इच्छुक पुरुष उमेदवारांनी स्वपक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षाला जवळ केले. मात्र प्रत्यक्षात हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदचे आरक्षण महिलांना सुटल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. आपण घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. आरक्षणाने आता निवडणुकीचे नियोजन बदलल्यामुळे पुढच्या डावपेचासाठी सर्व पक्षीय नेते मंडळी कामाला लागली आहेत.
सोमवारी नगर परिषदांची आरक्षण सोडत जाहीर झाली. यात हिंगोली नगर परीषद इतर मागास प्रवर्ग महिला, वसमत व कळमनुरी नगर परिषद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे.परिणामी नगर परीषदेच्या तिन्ही सत्ताकेंद्रात महिलांचे नेतृत्व मिळणार आहे. तसेच स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग वाढून सत्तास्थानी येण्याची संधी निर्माण झाली आहे.
वसमत नगर परीषदेसाठी इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे. प्रभाग रचनेनंतर अनेक इच्छुक उमेदवार तसेच राजकीय मंडळींच्या नजरा नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. वसमतसह जिल्ह्यात भावी उमेदवारांच्या लालसेने झालेली पक्षांतरे नागरीकांना पहायला मिळाली. महाविकास आघाडीसह महायुती अंतर्गत ही युतीधर्माच्या सीमा तोडून भावी उमेदवारांची पळवापळवी पहायला मिळाली. इच्छूक उमेदवारांनी सामाजिक कार्यात सहभाग वाढवला होता. नागरीकांच्या अडीअडचणी, सुख, दुःख विचारले जात होते. मात्र आरक्षण सोडती मध्ये नगराध्यक्ष पद महिलासाठी आरक्षीत झाल्याने वेळ, पैसा, परीश्रम, पक्ष सर्व झोकुन दिलेल्या भावी उमेदवारांना आपल्या नियोजनात बदल करून राजकीय वाटचाल निश्चित करावी लागणार आहे. प्रमुख पक्षीय नेतेमंडळींची उमेदवार चाचपणीला सुरुवात झाली आहे. तर अनेकजण आपल्या अर्धांगिनीला निवडणूकीच्या मैदानात उतरवण्याच्या मनस्थितीत आहेत. अखेर हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदेच्या सत्तास्थानी महिलाराज येणार असून वर्षानुवर्ष समाजकार्यात, राजकारणात झोकुन दिलेल्या महिला नेत्यांना यानिमित्ताने सत्तास्थानाची मोठी संधी निर्माण झाली आहे.
