नांदेड परिक्षेत्राची ई- गव्हर्नन्स मध्ये प्रभावी अंमलबजावणी करत उत्कृष्ट कामगिरी…
—————–
नांदेड : इंजि. संदीप महाजन
—————–
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्राने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राज्य शासनाने प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविला होता. या अंतर्गत विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डिजिटल फाइल प्रणाली, तसेच नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी विविध तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या.
नांदेड परिक्षेत्राने या सर्व बाबींमध्ये प्रभावी अंमलबजावणी करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. विशेषतः पोलिस विभागात ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक वेगवान व पारदर्शक करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, नोंदी व्यवस्थापन, तसेच अंतर्गत कामकाजात डिजिटल पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत ‘ईगल आय’ (Eagle Eye) प्रणालीचा वापर, डेटा विश्लेषण, ऑनलाइन सेवा सुविधा आणि विविध डिजिटल उपाययोजनांमुळे पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता वाढली. तसेच Quality Council of India यांच्या निकषांनुसार करण्यात आलेल्या मूल्यमापनात नांदेड परिक्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली.
२८ मार्च रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल नांदेड परिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले असून, भविष्यातही अशाच प्रकारे तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.


