
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या शुभेच्छा, नांदेडमध्ये आनंदोत्सव…
————–
प्रतिनिधी :
————–
नांदेडचे सुपुत्र श्रीपाद भगवानराव शिरडकर- पांडे यांची उ.प्र.चे पोलिस महानिदेशक म्हणून आज पदोन्नती झाली आहे.
समस्त नांदेडकरासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे.
श्रीपाद शिरडकर यांचे प्राथमिक ते शालांत परिक्षे पर्यंत चे शिक्षण प्रतिभा निकेतन होळी नांदेड या शाळेत झाले आहे.
1983 ला शालांत परीक्षेत ते तात्कालिन औरंगाबाद बोर्डात चौथ्या क्रमांकावर होते.
अकरावी बारावी सायन्स काॅलेज नांदेड व नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद (संभाजीनगर) येथून बी ई ( मेकॅनिकल) पदवी संपादन केली.
मुंबईत काही महिने नौकरी व त्यानंतर लोकसवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
मात्र, इतक्यावर न थांबता त्यांनी परत प्रयत्न केले व या प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून 1993 मध्ये आयपीएस म्हणून त्यांनी उत्तर प्रदेश कॅडर स्विकारले.
पहिली नेमणूक मथुरा व नंतर उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात एसपी/ एसएससी म्हणून सेवा बजावली.
सीआयएएफ मध्ये आधी डीआयजी म्हणून हैदराबाद इथे व नंतर आयजी म्हणून मुंबईत सेवा बजावल्यानंतर ते आपल्या मुळ कॅडर मध्ये उ.प्र.परत गेले.
मागील सात वर्षापासून ते लखनौ इथे सेवेत आहेत.
या दरम्यान अतिरिक्त पोलीस महानिदेशक म्हणून काम करताना त्यांनी लखनौ आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
मागील वर्षांपासून अतिरिक्त पोलीस महानिदेशक, लखनौ झोन येथील यशस्वी कारकीर्द केल्यानंतर आज उ.प्र. सरकारने त्यांची पोलीस महानिदेशक (डी जी) या पदावर नियुक्ती केली आहे.
एक कुशल प्रशासक, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री शिरडकर यांची उ.प्र. पोलीस प्रशासनात ओळख आहे.
राज्य सरकारचे पोलीस पदक आणि राष्ट्रपतींचे पोलीस पदक देऊन याआधीच त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
भगवानराव पांडे व सौ मंदाताई दांपत्याचे सुपुत्र….
महसुली खात्यात अधिकारी असलेले (सेवानिवृत्त) भगवानराव पांडे व सौ मंदाताई यांचे श्रीपाद शिरडकर -पांडे सुपुत्र आहेत. शालेय शिक्षणापासून अभ्यासात ते नेहमीच पाचध्ये राहिले आहेत. शिरडकर दांपत्याने श्रीपाद यांना घडविण्यासाठी अपार कष्ट घेतले. आज आपला मुलगा देशातील एका मोठ्या राज्याचा पोलिस महासंचालक झाला याचा त्यांना मनोमन आनंद झाला आहे.
पोलीस महानिदेशक म्हणूनही त्यांची कारकीर्द उज्वल राहो या साठी नांदेडच्या या सुपुत्रास “शिव सकाळ” डिजिटल माध्यमाच्या वतीने भरभरून शुभेच्छा…!
