पुर्णा साखर कारखाना, कपीश्वर शुगर्स यासह महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या तसेच हिंगोली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळाचा रोजगार मेळाव्यात सहभाग….
——————-
प्रतिनिधी :
——————-
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने गुरुवार ता.२५ रोजी वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात दहावी ते पदवीधर विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात पुर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमत, कपीश्वर शुगर्स ॲन्ड केमिकल्स लि. जवळा बाजार ता. औंढा नागनाथ, ग्रोवस ऑटो इंडिया प्रा.लि.पुणे, आर्मस इंडिया प्रा.लि. वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर, उत्कर्ष स्मॉल फायनांन्स बँक, इन्स्पायर कोचिंग क्लासेस हिंगोली, मुथ्थुट फायनान्स हिंगोली, भारत फायनान्स हिंगोली, स्वतंत्र मायक्रो फायनान्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, धूत ऑटोमोटीव्ह सिस्टीम्स प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर, नवभारत फर्टीलायझर लि. छत्रपती संभाजीनगर, सक्षम शक्ती फाऊंडेशन अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 350 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावे. तसेच स्वत: मूळ कागदपत्रांसह बहर्जी स्मारक महाविद्यालय, मुडी रोड, बहिर्जी नगर, वसमत येथे गुरुवार, (दि. 25) रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
