माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा या़च्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय…
———————
प्रतिनिधी :
———————
वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीत सुरुवातीपासून राजकीय स्फोटांना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी ता.२१ माजीमंत्री तथा शिंदेसेनेचे नेते डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अपक्ष उमेदवारांची मोट बांधून नगराध्यक्ष पदासह निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून हा नविन राजकीय स्फोट शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
महायुती मधील घटकपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा देत संपुर्ण प्रभागात उमेदवार देण्याची सुचना केली होती. त्यानंतर माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, डॉ मारोती क्यातमवार यासह ज्येष्ठ नेत्यांनी मुलाखती घेऊन उमेदवार निवडले. उमेदवारांनी आपापली उमेदवारी दाखल केली. त्यानंतर उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पहिला राजकीय ट्विस्ट जनतेसमोर आला. शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष बांगर व वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांच्यात दिलजमाई होऊन युतीचा नविन चेहरा ऐनवेळी समोर आला. विशेष म्हणजे पक्षाच्या वतीने स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना विश्वासात न घेता युती करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला नगराध्यक्ष पद दिल्याचा आरोप करण्यात आला असून उमेदवारी दाखल केलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सविता क्यातमवार यांच्यासह सर्व उमेदवार अडचणीत आले. विशेष म्हणजे शिंदे शिवसेनेचे पक्षनिरीक्षक असलेले डॉ जयप्रकाश मुंदडा यांना याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आली नसल्याचे स्वतः डॉ मुंदडा यांनी सांगितले. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी डॉ मारोती क्यातमवार यांना भाजपात प्रवेश देऊन पक्षाच्या एबी फार्म सह दोन नंबरवर उमेदवारी दाखल करणे, परत दुसऱ्या दिवशी भाजपाच्या जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत माजी नगराध्यक्षा सुषमा बोड्डेवार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर जनतेसमोर दुसरा राजकीय ट्विस्ट समोर आला.
दरम्यान शुक्रवारी माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्यासह डॉ मारोती क्यातमवार व इतर उमेदवार उपस्थित होते. या वेळी झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त करीत आम्ही अपक्षांची मोट बांधून निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे सांगून सविता क्यातमवार ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील असे डॉ मुंदडा यांनी जाहीर केले. आमच्याबरोबर २५ अपक्ष उमेदवार असल्याचा दावा डॉ मारोती क्यातमवार यांनी केला आहे. दरम्यान हा तिसरा राजकीय ट्विस्ट जनतेसाठी चर्चेचा विषय बनला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २५ नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी चौथा राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी जनतेला वाट पहावी लागणार आहे.


