
नदी, ओढयाच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने उरलेसुरले पिके हातची गेली, पुराच्या वेढयाने अनेक गावांचा संपर्क तुटला
———————–
प्रतिनिधी :
मागील पंधरवाड्यापासून उभी पिके पाण्याखाली असल्याने हातची गेली आहेत. तर शेकडो हेक्टरवरील पिके मातीसहीत खरडून गेली आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी १ वाजता सुरु झालेला मुसळधार पाऊस १२ तास उलटून गेला तरी सारखाच सुरु आहे. परिणामी नदी, ओढयासह सखल भागावर ही पाणीच पाणी झाले आहे. पुर परिस्थिती निर्माण झाल्याने वसमत शहराला जोडणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वसमत-आसेगाव मार्गे नांदेड रस्ता बंद झाला आहे.तसेच वसमत चुडावा मार्गे पुर्णा रस्ता बंद झाला आहे. तालुक्यातील माळवटा, दारेफळ, राजावाडी घराच्या भिंती कोसळल्या आहेत तर कच्ची घरे कोसळल्याची माहिती आहे. याबरोबरच कुरुंदा कोठेवाडी, किन्होळा, गुंज, टेंभूर्णी, चोंडी बहीरोबा या गावात पुराचे पाणी शिरल्याची माहिती आहे. तसेच चोंडी बहीरोबा येथील पुल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. अनेक ग्रामस्थ पुराच्या वेढ्यामुळे शेतातील शेतात तर गावातील अडकले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना जिवरक्षक टिमकडून सुरक्षीत बाहेर काढले जात आहे.
वसमत शहरात अनेक वसाहतीत शिरले पाणी, न.प. चे मदतकार्य सुरू
अतिमुसळधार पावसामुळे वसमत शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सखल भाग असलेल्या तथागत नगर, लिंबोनी नगर, तसेच कौठा रोडवरील काही वसाहती व कारखाना रोडवरील काही भागातील वसाहती मधील घरात पाणी शिरले आहे. दगडगाव रस्त्यावरील नाल्यात साचलेले पाणी जेसीबीच्या साह्याने काढून मोकळ्या केल्या जात आहेत. नगर परीषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी सदरील वसाहतींना भेट देत पाहणी केली तसेच सदरील नागरीकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. वसाहतीच्या जवळ असलेल्या शाळेत व मंगल कार्यालयात नागरीकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यांची जेवणाचीव इतर व्यवस्था केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी सांगितले
पुढील तीन तासांत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अलर्ट..
पुढील ३ तासांत जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजांसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
