
स्थानिक गुन्हे शाखा, वसमत ग्रामीण पोलिसांची कामगिरी, वाटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता…
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमत तालुक्यातील वसमत ते निळा मार्गावर पिस्टलचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ता. ८ पहाटे अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, लोखंडी रॉड व इतर साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वमसत ते निळा मार्गावर पाच जण एक दुचाकी वाहन रस्त्यावर उभी करून प्रवाशांना पिस्टलचा धाक दाखवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गुन्हे शाखेचे पोेलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, ज्ञानेश्वर गोरे, विजयकुमार उपरे, साहेबराव चव्हाण, आंबादास विभुते यांच्या पथकाने पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास या भागात पाहणी केली.
यावेळी पाच जण रस्त्याच्या बाजुला दबा धरून बसल्याचे दिसून आले. मात्र पोलिस आल्याचे लक्षात येताच त्यांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक दुचाकी वाहन, एक पिस्टल, एक जिवंत काडसूत, दोरी व इतर साहित्य जप्त केले आहे. त्यांच्याकडे सापडलेली दुचाकी त्यांनी नांदेड येथून चोरून आणल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सुरज जाधव, अक्षय पवार (रा. वसमत) यांच्यासह अरुण पवार व इतर दोघांवर यापुर्वी खुन, दरोडा, जबरी चोरीचे सुमारे १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तर सुरज जाधव हा नुकताच एमपीडीएच्या कारवाईतून सुटून आला होता. पोलिसांनी अन्य दोन आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा डाव उधळल्या गेला आहे. यापुर्वीही वसमत- निळा मार्गावर वाटमारीच्या घटना घडल्या आहेत त्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
