2 बोटी, 1 पोकलेन व 200 ब्रास वाळू जप्त…
——————–
प्रतिनिधी :
——————–
हिंगोली जिल्हा पोलिस व महसूल प्रशासनाने वाळू माफियाविरोधात मोठी आंतरजिल्हा संयुक्त कारवाई करत तब्बल ६५ लाख रुपयांच्या मुद्देमालासह २ बोटी, ९ पोकलेन यंत्रे व अंदाजे २०० ब्रास वाळू जप्त केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व पोलिस अधीक्षक नीलम रोहन यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री सेनगाव पोलिस स्टेशन हद्दीत ब्रह्मपुरी परिसरातील नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली.
सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना व सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान 2 बोटी, 1 पोकलेन यंत्रांच्या सहाय्याने अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याचे आढळले. तसेच सुमारे 200 ब्रास वाळूचा साठा आढळून आला.

सदर ठिकाण हे जिंतूर (जि. परभणी) हद्दीत येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही जिल्हा प्रशासनांनी समन्वय साधून संयुक्त कारवाई केली. जप्त केलेला वाळू व इतर साहित्य असा एकूण ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक नीलम रोहन, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.


