स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, तीन जणांवर गुन्हा दाखल…
——————–
साईनाथ पतंगे
——————-
हिंगोली शहरात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल ४ लाख ९७ हजार ७२ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील अवैध तंबाखू विक्री व्यवसायाला मोठा धक्का बसला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. जिलाम रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहरातील पेशानपुरा भागातील एका इसमाने भाड्याच्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे.
या खात्रीशीर माहितीनंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकत संबंधित ठिकाणी झडती घेतली. या कारवाईत ४,९७,०७२ रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पान मसाला, आर.के. सुगंधित पान मसाला, सुगंधित डी-९ तंबाखू तसेच रजनीगंधा सुगंधित पान मसाला असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी आर्यन खान मुस्ताक खान (वय २२, रा. पेन्शनपुरा, हिंगोली), शेख अझर शेख अनिस (वय २९) तसेच अन्य एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपअधीक्षक मयूर रसाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोउपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलीस अंमलदार किशोर सावंत, आजम तप्यारेवाले, विशाल खंडागळे तसेच चालक पोलीस प्रशांत वाघमारे यांचा सहभाग होता.
शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


