
हिंगोली जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन
——————–
प्रतिनिधी :
——————–
राज्य शासनाच्या वतीने 27 ऑगस्ट, 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत संस्था किंवा स्थानिक पोलीसाकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था याची परवानगी घेतलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. 20 जून, 2025 च्या शासन निर्णयात नमूद निकषाची पूर्तता करणाऱ्या, करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना शासन निर्णयातील परिशिष्ट अ येथे आहे. या गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. ही अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने नमूद करण्यात आली आहे. या स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर 26 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. शासन निर्णयातील निकषाची पूर्तता केलेल्या जिल्ह्यातून एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस करण्यात येईल.
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रथम 5 लाख, द्वितीय 2.5 लाख आणि तृतीय क्रमांक आलेल्या गणेश मंडळाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हास्तरावरुन जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
