निवडणूक विभागाविरुद्ध नागरीकांचा संताप, न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची अनेकांची तयारी…
——————–
प्रतिनिधी :
——————–
मोठ्या प्रतिक्षेनंतर लागलेल्या नगर परीषदेच्या निवडणुकीतील मतदार याद्यांचे घोळ काही अंतिम क्षणापर्यंत थांबता थांबेनात. अंतिम यादीत सर्व काही सुरळीत असताना दुरुस्तीच्या पुरवणी यादीत अनेकांचे नावे इतर प्रभागात वळवले गेल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे मतदारांची सहमती नसताना हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यांचा करताकरवीता धनी जो कोणी असेल त्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी मतदार नागरीकांकडून होत आहे.
सोमवार ता.१० पासून नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ऐन टप्प्यावर निवडणूक आली तरी मतदार याद्यांचे घोळ निवडणूक विभागाला सूटत नाहीत. यापुर्वी अंतिम यादी प्रसिद्ध केल्याचे सांगितल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी एक हजार रुपये देऊन मतदार यादी विकत घेतली. आणि यादीनुसार मतदारांच्या भेटी सुरु केल्या. त्याननतर निवडणूक विभागाने पत्रकार परिषदेत सदरील मतदार यादी अंतिम नसल्याचे सांगून इच्छुकांची हवा काढली. दुरुस्तीची पुरवणी यादी प्रसिद्ध होणार असल्याचे सांगण्यात आली. रविवारी ता.९ दुरुस्तीची पुरवणी यादी इच्छुक उमेदवारांच्या हाती पडली असता त्यांच्या प्रभागातील ५० ते १०० नावे इतर प्रभागात वळवलेली दिसली. सदरील प्रकार पाहून अनेकांची झोप उडाली. मागील कित्येक वर्षांपासून घरदार असलेल्या नागरीकांना ज्या प्रभागाचा संबंधच नाही अशा प्रभागात फेकले. प्रभाग क्रमांक १५ मधील तब्बल ९० मतदार इतर प्रभागात वळवले असून असेच प्रकार इतर प्रभागातही झाल्याचे आढळले आहे.
काही तासावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ येऊन ठेपलेली असताना समोर आलेला मतदार यादीचा घोळ इच्छुक उमेदवार व मतदारांची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त करीत या पाठिमागच्या करताकरविता धन्यावर कर्यवाही करावी अशी मागणी करीत न्यायालयीन दरवाजा ठोठावण्याचा असल्याचे बोलून दाखवले आहे.


