हजुरी पाठी संघटने’चे प्रशासनाला साकडे, आमदार नवघरे यांना दिले निवेदन…
——————–
साईनाथ पतंगे
——————–
वसमत येथील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वारा दमदमा साहिब परिसरातील तलावाच्या दूषित पाण्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून याचे भाविकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ‘हजुरी पाठी संघटने’ने पुढाकार घेत आमदार राजू नवघरे यांना निवेदन दिले असून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
बसमत येथील गुरुद्वारा दमदमा साहिब हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून येथे दररोज देश-विदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गुरुद्वारालगत असलेला जुना तलाव हा या परिसराच्या सौंदर्य आणि पवित्रतेचा एक भाग मानला जातो. सध्या या तलावाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम प्रशासनामार्फत सुरू असले तरी प्रत्यक्षात कामामध्ये मोठ्या त्रुटी दिसून येत आहेत.
गुरुद्वाराच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याचे सांडपाणी थेट तलावात मिसळत असल्याने तलावात मोठ्या प्रमाणावर घाण साचली आहे. यामुळे पाण्याची गुणवत्ता पूर्णपणे खालावली असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. या परिस्थितीमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या समस्येबाबत यापूर्वीही ‘हजुरी पाठी संघटने’च्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी, वसमतचे उपविभागीय अधिकारी, नगरपरिषद अध्यक्ष तसेच तहसीलदार यांना वेळोवेळी लेखी निवेदने देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस आणि प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजीचा सूर वाढत असून, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले की, गुरुद्वारा परिसराची पवित्रता राखणे आणि येथे येणाऱ्या भाविकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे तलावाच्या कामात तातडीने सुधारणा करून नाल्याचे सांडपाणी तलावात जाणे पूर्णपणे थांबवावे, तसेच तलावाची स्वच्छता व योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर अध्यक्ष स. दलजितसिंग बिशनसिंग हजुरी पाठी, उपाध्यक्ष स. प्रदीपसिंग जितसिंग रागी, सचिव स. जगदीपसिंग मोहनसिंग नंबरदार तसेच सदस्य हुकमसिंग कराबिन, महिंदरसिंग पैदल आणि हरनामसिंग चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या असून, लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.


