
वसमत येथे उपविभागीय आढावा बैठक संपन्न, विविध विभागप्रमुखांकडून घेतली माहिती
——————
वसमत :
——————
रात्री-बेरात्री आलेल्या सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रपाळीवर नियुक्त्या द्या असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी बुधवारी ता.१३ वसमत येथील उपविभागीय आढावा बैठकीत दिले.
वसमत येथील तहसिल कार्यालयातील सभागृहात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी वसमत येथे आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थित भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व इतर नागरीकांनी आरोग्य विभागाच्या तक्रारीचा पाढाच वाचला. आरोग्य विभागाच्या व रुग्णालयाच्या प्रमुखांचे काम चांगले असल्याचे सांगून अंतर्गत वैद्यकीय अधिकारी रुग्णांना योग्य सेवा देत नाहीत. तसेच रात्री-बेरात्री आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात परिणामी रुग्णांना नांदेड येथे उपचारासाठी पाठवले जाते. अशी तक्रार करताच राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रपाळीवर नियुक्त्या द्या असे निर्देश दिले. यासह ग्रामीण पाणीपुरवठा, वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा , स्वच्छता, आवास योजनेसाठी मिळणारी दामदुप्पट वाळू आदी तक्रारी करण्यात आल्या. यावर राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना सुचना करीत तक्रारींचा निपटारा करा असे निर्देश दिले. त्याबरोबरच
स्क्रीनिंग, एक्स रे, निक्षय मित्र, क्षयरुग्णमुक्त ग्रामपंचायत, राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणांच्या 100 दिवस कार्यक्रमात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सहा महिन्यात 400 ग्रामपंचायती 100 टक्के टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरविले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आजारांची लक्षणे वेळेत लक्षात आल्यावर वेळेत उपचार सुरू करता येतील. यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवा. मलेरिया मुक्त अभियान, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
शेतकामासाठी जात असलेल्या गुंज येथील महिला मजुरांचा विहिरीत ट्रॅक्टर पडून एप्रिलमध्ये मृत्यू झाला होता. त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी वाढीव गावठाणाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश दिले. तसेच घरकुल लाभार्थ्यांना 2 ब्रॉस मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले. शासकीय अधिकाऱ्यांनी गोरगरिबांची कामे सेवाभावातून पूर्ण करावीत व वेळेत योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा , महावितरण विभागाकडून पारडी येथे तात्काळ वीज वितरण करणारे नवीन खांब बसविण्यात यावे व वीज मीटर बसविण्याची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार शारदा दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, महिला जिल्हाध्यक्षा उज्वलाताई तांभाळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, महिला व बालविकास अधिकारी दरपलवार, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांच्यासह विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
