
वसमतला वसुमती महोत्सवात ‘ आम्ही भारताचे लोक’ या विषयावर व्याख्यान….
वसमत,ता.११
आपल्याकडे संविधान आहे परंतू संविधान वाचनारे लोकं नाहीत. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ३ कोटी लोकांनी सुध्दा संविधान वाचले नसेल. त्यामुळे जो समाज संविधानाच्या बाबतीत अडाणी असेल तो समाज देशाचा आणि समाजाचा विकास करु शकत नाही असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. ते ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर बोलत होते.
येथील सुरमणी प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसूमती महोत्सवात साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राजु नवघरे, तहसिलदार शारदा दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की संविधान हे देशाचं, माणसाचं , समाजाचं बायबल आहे. आपल्याकडे लोकशाही आहे परंतू लोकशाही कर्ते म्हणवणारे नागरीक नाहीत. आपल्या देशात संविधान आहे, पाणी आहे, राजकारण आहे मात्र त्याला लागणारी साक्षरता नाही. म्हणून अडाणी असलेला नागरीक हा कधीही वर्तमान आणि भविष्य मोठ्या ताकतीने धरु शकत नाही असं ते म्हणाले.
तत्कालीन समाज व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले की, प्रदेश होता पण राष्ट्र नव्हते, माणसं होती पण ती गुलाम होती . राष्ट्र मी नाही तर आम्ही जन्माला घालत असतो. तुकड्या तुकड्यात देशातील माणूस विखुरला गेला होता. प्रदेशाचे तुकडे होते, ४०० संस्थानिक, राजे होते. त्यावेळी प्रजेने आंदोलने करीत . आम्हाला संस्थान, राजे नको तर भारत व लोकशाही पाहिजे अशी भूमिका घेतली. अशा परिस्थितीत डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस केंद्रबिंदू असलेली राज्यघटना देशाला दिली. परिणामी देशातला सर्व सामान्य माणूस भारताचा मालक झाला.
सामाजिक न्याय सांगण्यात राजकीय लोकं अपयशी….
संविधानाने न्याय आणि सामाजिक न्याय दोन घटक दिले. लाडक्या बहिणीना १५०९ रुपये प्रति महिना दिला जातो म्हणजे तो सामाजिक न्याय आहे परंतू राजकीय लोकं हे न सा़गता केवळ मता़चे गणित लावत असतात अशी शेवटी त्यांनी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाला शहर व परिसरातील साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
