
‘साने गुरुजींची जिवनगाथा’ ग्रंथावर वाचन अभिप्राय स्पर्धेत अव्वल कामगिरी…
वसमत,ता.१०
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर या संस्थेच्यावतीने साधना प्रकाशनाचे लेखक राजा मंगळवेढेकर लिखित “साने गुरुजींची जीवनगाथा” या ग्रंथावर वाचन अभिप्राय राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर केली होती. यावेळी पाच पारितोषिक जाहीर करण्यात आली होती. या स्पर्धेत वसमत येथील संगीता देशमुख (हिंगोली) यांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांकांचे पारितोषिक पटकावले आहे. ११ जून २०२५ रोजी साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त अंमळनेर जि.जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर या संस्थेच्यावतीने साधना प्रकाशनाचे लेखक राजा मंगळवेढेकर लिखित “साने गुरुजींची जीवनगाथा” या ग्रंथावर वाचन अभिप्राय राज्यस्तरीय स्पर्धा ही आगळीवेगळी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेअंतर्गत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना लेखक राजा मंगळवेढेकर लिखित “साने गुरुजींची जीवनगाथा” हे पुस्तक आयोजकामार्फत देण्यात आले. स्पर्धकांनी हे पुस्तक वाचून त्यावर ठराविक वेळेत अभिप्राय द्यायचा होता. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु 4100 /-, द्वितीय पारितोषिक रु 3100/-, तृतीय पारितोषिक रु 2100/-, चौथे पारितोषिक रु 1100/-, पाचवे पारितोषिक रु 1100/- असे पारितोषिकाचे स्वरूप ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत वसमत येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका संगिता देशमुख यांनी प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत. द्वितीय पारितोषिक शिवाजी गुंडू हुद्दार, बेळगाव, तृतीय पारितोषिक प्राचार्य नारायण पवार, जळगाव, चौथे पारितोषिक सोहेल अख्तर लांडगे, पुणे, पाचवे पारितोषिक ॲड. भूपती जगधने, सोलापूर यांनी प्राप्त केले आहेत.
आज जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ तसेच प्रांतवाद, भाषावाद वाढत असतांना साने गुरुजींचे विचार आजच्या काळात अत्यंत महत्वाचे ठरतात. तसेच मानवतेचा विचार समाजात रुजले पाहिजेत. या हेतूने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 11 जून 2025 रोजी साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त अमळनेर जि. जळगाव येथे विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.
