
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न
———————
प्रतिनिधी :
———————
गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, वाई गोरक्षनाथ यात्रा व दसरा महोत्सव हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत. जिल्ह्यात हे सण साजरे करतांना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द व शांतता ठेवून साजरे करावेत, असे आवाहन मंगळवार ता.१९ पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधिक्षक कमलेश मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. कोकाटे म्हणाले, डिजेचा आवाजामुळे उत्सव काळात ध्वनी प्रदूषण मोठे होते. नागरिकांनी डीजे न लावता व विविध सामाजिक उपक्रम राबवून सण उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. कोकाटे यांनी केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. उत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. पोलीस प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांनी योग्य माहिती द्यावी. कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. उत्सव काळात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी चांगले नियोजन केले असून नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याचे श्री कोकाटे यांनी सांगितले.
सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी. सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट करताना त्याची खातरजमा करावी. चुकीच्या पोस्टची माहिती दिल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्वांनी मिळून शांततेत व एकतेने सण साजरे करुन हिंगोली परंपरा कायम ठेवावी, अशा सूचना अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी दिल्या.
सामाजिक एकात्मता व अखंडता राखण्यासाठी प्रयत्न करावा. उत्सव साजरे करताना एकोप्याने, शांततेने व समोपचाराने साजरे करावेत. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सण, उत्सव आदर्श पद्धतीने साजरे करावेत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिल्या.
शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव, ईद ए मिलाद व दसरा महोत्सव या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य, सर्व सामाजिक नेत्यांनी आपापल्या गावात, नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावे. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
