शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदार दलालाचे उखळ पांढरे करण्यासाठी
——————
प्रतिनिधी :
—————–
निवडणूुकीच्या तोंडावर सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देेऊनही त्याचे पालन न करणाऱ्या दगाबाज सरकारचा शेतकऱ्यांनी पंचनामा करावा असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजीमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी ता. ७ जवळाबाजार व डोंगरकडा येथे केले.
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्हयातील डोंगरकडा व जवळाबाजार येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे, जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, महायुतीचे सरकार दगाबाज सरकार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन अद्यापही पाळले नाही. खरीप हंगामात पिक, जमीनीसोबतच शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्यच वाहून गेले असून आता त्यांना मदतीची खरी गरज असतांना सरकार जून महिन्यात कर्जमाफी देण्याचे सांगत आहे. जून महिना कशासाठी असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही, काही ठिकाणी पंचनामे झाले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शासकिय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
शक्तीपीठ दलालांचे उखळ पांढरे करणारे…
शासनाकडून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. ८६००० कोटी रुपयांचा महामार्ग पूर्ण होईपर्यंत १.५० लाख कोटी रुपयांचा होईल. त्यासाठी शासनाकडून सुधारीत प्रशाकिय मान्यता काढली जाईल. मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत अन शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे का नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदार अन दलालांचे उखळ पांढरे करण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यात शेतकरी अडचणीत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणुकीत बिझी होते. आता ते पवारांनी बळकावलेल्या जमीनीवर पांघरून घालण्यात बिझी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना म्हणून आम्ही काम करणारच आहोत पण आता शेतकऱ्यांनी व नागरीकांनीही पुढे येऊन सरकारची वोट बंदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


