
आरोग्य विभागाच्या वतीने संजिवनी अभियान गौरव पुरस्कार सोहळा संपन्न….
——————–
प्रतिनिधी :
——————-
संजीवनी अभियान कार्यक्रमाला देशपातळीवर मानांकन मिळवून देण्याचे काम आरोग्य विभागातील आशाताईपासून सर्व तंत्रज्ञ, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगून, हिंगोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने संजीवनी अभियान गौरव पुरस्कार सोहळ्याचे मंगळवारी ता.१४ आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विशाल पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील महिलांची संख्या विचारात घेऊन महिलामधील कर्करोगाचे निदान होऊन लवकर उपचार व्हावेत, यासाठी जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील महिलांची स्क्रींनींग करण्यात आली. संशयित महिलांची सर्व तपासण्या केल्यानंतर त्यामध्ये 35 महिलांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. या सर्व महिलांना वेळीच निदान केल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे झाले. शेवटच्या टप्प्यावर रुग्ण गेल्यावर त्याला वाचवणे शक्य होत नाही. या संजीवनी अभियानामुळेच हे शक्य झाले आहे. या सर्व भगिनीच्या आशिर्वादामुळेच अभियानाला देशपातळीवर मानांकन मिळाले आहे. हे सर्व आशाताई, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू यांनी प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन महिलांचा डाटा गोळा केल्यामुळे शक्य झाले आहे. हा उपक्रम आता राज्यभर राबविण्यात येत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
आता जिल्हा प्रशासनामार्फत कुपोषण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्तनदा महिला, गर्भवती महिलांचा डाटा गोळा करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. आपणामार्फत हे अभियानही यशस्वी करुन प्रधानमंत्री ॲवार्ड मिळवाल, अशी अपेक्षा व्यक्त करुन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सर्व गौरवमूर्तीचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी केले. या संजीवनी अभियान गौरव पुरस्कार सोहळ्यात आशाताईपासून तालुका आरोग्य अधिकारी तसेच अभियानात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग नोंदविलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील आशाताई, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, सीएचओ, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
