
हिंगोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विवीध विकासकामे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई यांचा भाजपात प्रवेश
**********
वसमत
**********
राज्यातील इतर तालुक्यांसोबत हिंगोली जिल्हयातील गोरेगाव व आखाडा बाळापूर तालुका निर्मितीचा निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ता. २९ हिंगोली येथे दिले आहे.
हिंगोली येथे विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, श्रीकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, हिंगोली जिल्हयातील गोरेगाव या अप्पर तालुका निर्मितीची घोषणा मी केली होती. आता या ठिकाणी तालुकाच्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पुढील काळात राज्यातील इतर तालुक्यांच्या निर्मितीसोबतच गोरेगाव तालुका घोषीत केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व सुविधा आधीच मिळालेल्या असतील. तर आखाडा बाळापूर तालुक्याबाबत माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नांव दिले जाईल. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवा निमित्त देशाचे आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे विकास कामांसाठी तसेच संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे विकास कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व संशोधन केंद्राला १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून या केंद्राचे काम सुरु आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी हळद शिजविणे व इतर कामांसाठी लागणाऱ्या यंत्र सामुग्रीसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महिलांसाठी सहकारी संस्था स्थापन करून बचतगटातील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख भाजपात..
हिंगोली जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी यावेळी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा यावेळु सत्कार केला. मोठी राजकीय ताकत असलेले दिलीपराव देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी काळात कळमनुरी तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यात भाजपाचे बळ वाढणार आहे.
