डॉ क्यातमवार यांची पुन्हा संधी हुकली, ऐनवेळेच्या घडामोडींने वसमतकर हैराण…
——————-
प्रतिनिधी :
——————
वसमत नगर परीषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शिंदेसेना युतीचा व महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा तिढा सुटला असला तरी भाजपाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवणे बाकी होते. डॉ मारोती क्यातमवार यांच्या पत्नी सविता क्यातमवार व शिवदास बोड्डेवार यांच्या पत्नी सुषमा बोड्डेवार या दोघांची उमेदवारी दाखल असल्याने नेमकं भाजपाचा उमेदवार कोण हे निश्चित होते बाकी होते. गुरुवारी ता.२० वसमत येथे राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर व आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भाजपा जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सुषमा बोड्डेवार यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे आश्वासन घेऊन भाजपात प्रवेश केलेले डॉ मारोती क्यातमवार यांची पुन्हा संधी हुकली असल्याने त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी पहावयास मिळाली.
दोन महिन्यांपूर्वी डॉ मारोती क्यातमवार यांनी काँग्रेसमधून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. कमी वेळेत पक्षाची बांधणी करुन स्वबळाच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची फौज सज्ज केली. मात्र ऐन वेळी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वबळाचा नारा विसरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी हातजुळवनी करीत युती केली. या ऐनवेळेच्या युतीमधील वाटाघाटीत नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिले गेल्याने डॉ क्यातमवार नाराज झाले. त्यानंतर भाजपाकडून नगराध्यक्षपदाचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही मिनिटांचा विलंब असताना भाजपात प्रवेश केरुन भाजपाच्या वतीने सविता क्यातमवार यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केली . तत्पूर्वी भाजपा नेते शिवदास बोड्डेवार यांच्या पत्नी सुषमा बोड्डेवार यांची उमेदवारी दाखल झाली होती. दोन्ही उमेदवारांना पक्षाचा एबी फाँर्म असल्याने एका उमेदवारांवर टांगती तलवार होती. त्यामुळे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा तिढा कायम होता. गुरुवारी वसमत येथे राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपा जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत सुषमा बोड्डेवार यांच्या नावाची घोषणा करीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मात्र आश्वासन दिलेले असताना उमेदवारी नाकारल्याने डॉ मारोती क्यातमवार यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. याबाबत डॉ मारोती क्यातमवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाराजी व्यक्त करीत भाजपाकडून उमेदवारी नाकारल्याचे सांगितले. यावेळी भाजपाकडून स्विकृत सदस्याचे आश्वासन दिले मात्र आपल्याला त्यात अजिबात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


