
आकाश दीपचा पंच , मालिकेत १-१ बरोबरी ,
—————-
बर्मिंघम :
—————-
भारतीय संघात अनेक नवीन चेहरे, नवीन नेतृत्त्व अशात टीम इंडियाने मोठी कामगिरी करून दाखवली आहे.टेस्टच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यावर अखेरीस भारताने विजय मिळवला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अशक्य वाटणारा इतिहास रचत इंग्लंडला एजबेस्टनच्या मैदानावर पहिल्यांदाच पराभूत केलं आहे. या विजयासह भारताने दुसऱ्या टेस्ट सामन्यात 336 धावांनी दणदणीत यश मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
भारताच्या पहिल्या डावात 587 धावा
भारतीय क्रिकेट संघ हेडिंग्लेच्या लीड्सच्या मैदानावरील पराभवाची सल मनात घेऊन बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर उतरला होता. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स यानं टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 587 धावा केल्या. यशस्वी जयस्वालनं 87 धावांची खेळी करत चांगली सुरुवात केली. यानंतर करुण नायर, केएल राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. याचवेळी कॅप्टन शुभमन गिल यानं रवींद्र जडेजा सोबत 203 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजानं 89 धावांची खेळी केली. शुभमन गिलनं 269 धावांची खेळी केली. भारत या जोरावर 587 धावांपर्यंत पोहोचला.
इंग्लंडला 407 धावांवर रोखलं. भारतानं मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर रोखलं. सिराजनं 6 विकेट घेतल्या तर आकाश दीपनं 4 विकेट घेतल्या. हॅरी ब्रुकनं 158 धावा केल्या तर जेमी स्मिथ 184 धावा करुन नाबाद राहिला. भारताच्या दोन्ही गोलंदाजांनी इंग्लंडच्या 6 फलंदाजांना खातं देखील उघडू दिलं नाही. यामुळं इंग्लंडचा संघ 407 धावांवर बाद झाला आणि भारताला 180 धावांची आघाडी मिळाली.
शुभमन गिलचं शतक, भारताचा इंग्लंडला 608 धावांचं लक्ष्य
भारतानं दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या 161 धावा आणि केएल राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 427 धावांवर डाव जाहीर केला. शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावा केल्या तर दुसऱ्या डावात शतक केलं. पहिल्या कसोटीत भारताची मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर अपयशी ठरली होती. त्यांनी दोन्ही डावात कामगिरी सुधारली. भारतानं 6 बाद 427 धावांवर संघ जाहीर केला. यामुळं इंग्लंडपुढं विजयासाठी 608 धावांचं लक्ष्य होतं.
इंग्लंडला दुसऱ्या डावात आकाश दीपचे धक्के
इंग्लंडला भारतानं दुसऱ्या डावात जोरदार धक्के दिले. आकाश दीपनं इंग्लंडचे ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रुक, बेन डकेट यांना बाद केलं. मोहम्मद सिराजनं क्रॉलीला बाद केल. तर, वॉशिंग्टन सुंदरनं बेन स्टोक्सला बाद केलं. यामुळं भारताची वाटचाल विजयाच्या दिशेनं झाली. जेमी स्मिथनं 88 धावा केल्या तर इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
