तपासात सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्वाचे, वसमत शहर पोलिस पथकाची कामगिरी..
——————–
प्रतिनिधी :
——————–
पुणे येथून खाजगी ट्रॅव्हल्स द्वारे वसमत येथे आलेले ७ लाख ३७ हजार ५३ रुपयांचे सॅमसंग कंपनीचे अँड्रॉइड 12 मोबाईलचे पार्सल चोरट्याने एका ट्रॅव्हल्स कार्यालयासमोरून लंपास केल्याची घटना १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता घडली होती. वसमत शहर पोलिसांच्या पथकाने तपासांची चक्रे फिरवत वसमत येथील एका चोरट्यास सीसीटीव्ही फुटेच्या सहाय्याने ताब्यात घेऊन बुधवार ता.१८ गुन्हा दाखल केला होता. तर गुरुवार ता १९ चोरी गेलेला मुद्देमाल चोरट्याकडून जप्त करण्यात आला आहे. काही तासात गुन्हेगारास बेड्या घातल्याने शहर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता करुणा मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड पुणे यांनी वसमत येथील अष्टविनायक कुरियर एजन्सी साठी साईराज ट्रॅव्हल्स द्वारे पाठविण्यात आलेले पार्सल ज्यामध्ये १ लाख ३७ हजार ५३ रुपयांचे सॅमसंग कंपनीचे अँड्रॉइड 12 मोबाईल होते. सदरील पार्सल खुराणा ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर ठेवले असताना अज्ञात चोरट्यांनी ते पळवले होते. याबाबत कुरिअर डिलिव्हरी करणारे दत्ता विनोद सोन्नर रा मरसूळ ता वसमत यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केंद्रे, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस बी डेडवाल सोबत डी बी पथक अंमलदार संभाजी लकुळे, नागोराव बाभळे, श्री रामदिनेवार यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला. तपासात सीसीटीव्ही फुटेच्या सहाय्याने शेख अरबाज शेख अफसर वय २६ रा. दर्गा मोहल्ला वसमत यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याच्याकडून चोरी गेलेले सॅमसंग कंपनीचे अँड्रॉइड 12 मोबाईल हस्तगत केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस बी डेडवाल करीत आहेत. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी वसमत शहर पोलीस पथकांचे कौतुक केले आहे.


