
गुन्हे शाखेच्या पथकाची वेळीच मदत, मृतांमध्ये एका बालकाचा समावेश…
**********
वसमत :
**********
वसमत तालुक्यातील कोठारी ते टोकाई मार्गावर टोकाई फाट्याजवळ भरधाव कार समोर उभे असलेल्या टिप्परच्या खाली घुसल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता 30 रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेळीच मदतीसाठी धावल्याने जखमींना तातडीने उपचार मिळणे शक्य झाले
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील एका कुटुंबातील आठ जण कार्यक्रमासाठी कार ने आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोल्डा येथून वसमत कडे निघाले होते. सदरील कार कोठारी ते टोकाई मार्गावर टोकाई फाटा शिवारात आली असताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार समोर उभ्या असलेल्या टिप्परच्या पाठीमागून आत घुसली.
या अपघातामध्ये कार मधील एका दोन वर्षाच्या दोन बालकासह शेख अमीर ( ४०) व अन्य सहा जण जखमी झाले. याच मार्गावरून हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार आजम प्यारेवाले, साईनाथ कंठे आकाश टापरे, रवींद्र साळवे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार गजानन भालेराव आंबेकर यांच्या पथकाने जखमींना तातडीने उपचारासाठी कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले
मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर एका दोन वर्षाच्या बालकासह शेख अमीर यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर अन्य दोन वर्षाच्या बालकासह सहा जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान सदरील टिप्पर नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर उभे असल्यामुळे हा अपघात घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
