जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानंतर वसमत येथे पथकांची कारवाई…
———————
प्रतिनिधी :

सर्व नागरीकांना घरगुती गॅस सिलिंडरच्या व्यवस्थित पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात पथकामार्फत घरगुती गॅसचा व्यवसायासाठी अनाधिकृत वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु आहे. सोमवारी ता.१६ वसमत येथे महसूल पथकामार्फत छापे मारण्यात आले असून घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या विविध हॉटेल चालकाकडून दहा गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की सध्या सुरु असलेल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार अशा आफवा सर्वत्र पसरल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात असा कुठलाही गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून अशा अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हा व तालुका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र असे असतानाही प्रत्यक्षात अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. तसेच वसमत शहर व परिसरात घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी ही होत्या.

त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार व तहसिलदार शारदाताई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तहसिलचे निरीक्षण अधिकारी पी.जी.हांडे, लिपिक राहूल कांबळे, लिपिक गणेश जाधव यांच्या पथकाने सोमवारी ता.१६ वसमत शहरातील हॉटेल रेस्टॉरंट याची तपासणी केली. या तपासणीत उपजिल्हा रुग्णालय जवळील माऊली स्पेशल चहा यांच्याजवळ १ इंण्डेन कंपनीचे एक सिलेंडर, अण्णा इडली सेंटर यांच्याकडे २ इंण्डेन कंपनीचे सिलेंडर, माऊली रगडा कॉफी सेंटर यांच्याकडे ४ इंण्डेन कंपनीचे सिलेंडर, लय भारी मुलाचा चहा तुमच्याकडे १ एचपी कंपनीचे सिलेंडर, सह्याद्री उपग्रह मोंढा रोड यांच्याकडे १ एचपी कंपनीचे सिलेंडर तर हॉटेल गरीब नवाज यांच्याकडे १ इंण्डेन कंपनीचे सिलेंडर असे मिळून एकूण १० घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर करीत असताना जप्त करण्यात आले आहेत.
व्यावसायिकाकडे घरगुती सिलेंडर येतात कुठून….?
ग्राहकांना ऑनलाईन नंबर लावल्यानंतर तीन ते चार दिवसांनी घरगुती १ गॅस सिलेंडर मिळते. परंतु व्यवसायिकांना ३ ते ४ घरगुती गॅस सिलेंडर कसे उपलब्ध होतात हा प्रशासनासाठी शोधाचा विषय आहे. तसेच एकाच नावावर दोन पेक्षा जास्त सिलेंडर आहेत का हे पण तपासण्याची गरज आहे.


