कार्यशाळेत उच्च शिक्षणातील क्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवणे आणि विद्यार्थ्यांची घटती उपस्थिती यावर मंथन….
——————-
प्रतिनिधी :

शिक्षणाचा ‘डिजिटल पॅटर्न’ आणि आव्हाने या विषयी कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “शासनाने उच्च शिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण सध्याच्या २८.४ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी ७०% ऑनलाईन आणि ३०% ऑफलाईन असा नवा ‘डिजिटल पॅटर्न’ सुचवण्यात आला आहे. मात्र, या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील उपस्थितीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.” विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो देशव्यापी चिंतेचा विषय बनला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव पंडितराव देशमुख यांनी स्पष्ट केले की, शिक्षणात केवळ विद्यार्थ्यांची संख्या महत्त्वाची नसून मूल्यवर्धित आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा संगम असणे आवश्यक आहे. “शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून ते जगण्याचा आधार असावे. विवेक आणि कौशल्याशिवाय शिक्षण व्यर्थ आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
विद्यार्थी अनुपस्थितीवर ‘गटचर्चा’ व उपाययोजना
दुपारच्या सत्रात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्या वेगवेगळ्या गटांनी स्वतंत्र चर्चा केली. या चर्चेतून विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचवण्यात आल्या. डॉ. बी. बी. खंदारे, डॉ. क्षीरसागर, डॉ. शारदा कदम आणि प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव यांनी या अहवालाचे वाचन केले.
कुलगुरू डॉ. चासकर यांनी या कार्यशाळेला सकारात्मक ठरवत म्हटले की, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी आता विद्यापीठाच्या चारही जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे संवाद घडवून आणले जातील. सर्वांनी सामूहिक प्रयत्नातून या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला माजी आमदार पंडितराव देशमुख, प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव, उपप्राचार्य डॉ. महेश स्वामी, डॉ. नरसिंग पिंपरणे, समन्वयक डॉ. रामभाऊ मुटकुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल मुगूटकर यांनी केले, तर आभार डॉ. प्रताप पाटील व डॉ. नरसिंग पिंपरणे यांनी मानले. या कार्यशाळेला हिंगोली जिल्ह्यातील प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


