रविवारी ता.८ सकाळी १० ते १ वसमत, दुपारी २ ते ५ औंढा नागनाथ, सोमवारी ता.९ सकाळी १० ते १२ कळमनुरी, दुपारी २ ते ४ हिंगोली….
——————–
प्रतिनिधी :
——————–
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीने हिंगोली जिल्ह्यात कंबर कसली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये दि. ८ आणि ९ मार्च रोजी विशेष ‘तालुका मेळाव्यांचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे मेळावे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर सुलताने व सुरेश शिरसाट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत.
या मेळाव्यांमध्ये प्रामुख्याने नवीन तालुका कार्यकारिणीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. भारिप बहुजन महासंघापासून ते आजच्या वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे, बूथ आणि सर्कल स्तरावर बांधणी करणे आणि अँड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या मेळाव्यांचा मुख्य उद्देश आहे. तसेच बहुजन, ओबीसी, मुस्लिम, आदिवासी आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या सर्व घटकांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष रणनीती आखली जाणार आहे.
मेळाव्याची सुरुवात रविवार ता.८ सकाळी १० ते १ (वसमत विश्रामगृह) आणि दुपारी २ ते ५ (औंढा ना. विश्रामगृह) येथे मेळावा संपन्न होणार आहे.
सोमवार ता.९ सकाळी १० ते १२ (कळमनुरी विश्रामगृह), दुपारी २ ते ४ (हिंगोली विश्रामगृह) आणि सायंकाळी ५ ते ७ (सुरुची हॉटेल, सेनगाव) येथे मेळावा संपन्न होणार आहे.
पक्षवाढीसाठी ज्यांना लेखी निवेदने द्यायची आहेत, त्यांची निवेदनेही यावेळी स्वीकारली जातील. या मेळाव्यांना जिल्ह्यातील सर्व माजी पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते आणि नव्याने सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्ञानेश्वर सुलताने व सुरेश शिरसाट यांनी केले आहे.


