
आखाड्यावरील टिन पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची हाक…
—————
प्रतिनिधी :
—————
सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या जिवनात अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक संकटाने जिवापाड जपलेल्या केळीच्या बागा घडासहीत आडव्या झाल्या. यात शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी शासनदरबारी हाक दिली असून या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
७ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात झाली आहे. पावसाने पहिल्या दिवसापासून झलक दाखवत यंदा पावसाळा मोठ्या प्रमाणात असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र ऋतू आणि वातावरणात झालेले बदल शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचे आणि आर्थिक संकट वाढवणारे ठरत आहेत. वादळीवारे, चक्रीवादळ, ढगफुटी आदी अचानक उद्भवलेल्या संकटाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. सुसाट आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. चार ते पाच फुट वाढलेले आणि वीस ते पंचवीस किलो वजनाचे घड केळीसह काही मिनिटांत जमिनदोस्त झाले. तर आखाड्यातील टिन पत्रे, ठिबक, सोलार आणि मोठी झाडे उन्मळून पडली. तसेच दुभती जनावरे या वादळी वार्यात जखमी झाले आहेत. यात शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. केळीवर वर्षाचे आर्थिक गणिते अवलंबून असलेला शेतकरी अक्षरशः या संकटाने मोठ्या संकटात सापडला आहे. या वादळी वार्याने केळीच पट्टा असलेल्या वसमत आणि कळमनुरी तालुक्याला लक्ष केले. यामध्ये वसमत तालुक्यातील गिरगाव, सोमठाना, बागल पार्डी सह इतर गावच्या शिवारात फटका बसला आहे तर कळमनुरीत तालुक्यातील डोंगरकडा, रेडगाव, वडगाव, जवळा पांचाळ, वरुड, भाटेगाव, हिवरा आदी गावातील शेती पिके उध्दवस्त झाली आहेत. विशेष म्हणजे मागिल वर्षी सुध्दा याच पट्ट्यातील केळी बागा आणि इतर शेती पिकांचे वादळी वाऱ्यामुळे आर्थिक नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावल्यामुळे मोठं आर्थिक संकट शेतकर्यांसमोर उभे राहिले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी क्षतीग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
अडीच हजार केळीच्या झाडापैकी दिड हजार झाडे जमिनदोस्त..
डोंगरकडा येथील शेतकरी सुभाष अडकिणे यांनी अडीच एकर जमिनीवर जैनची टिश्यू जी ९ रोपांची अडीच हजार झाडे लावली होती. सद्यस्थितीत ही झाडे १० ते ११ महिन्याची असून निसावली असल्याने विक्रीच्या तोंडावर उभी होती. मात्र सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्याने यातील घडाने लगडलेली दिड हजार केळीची झाडे जमिनदोस्त झाली. यामध्ये जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सुभाष अडकिणे यांनी सांगितले. अडीच हजार केळीच्या झाडांसाठी आजपर्यंत चार लाख रुपयाचा खर्च आला असून ऐन उत्पन्न हातात पडण्याच्या वेळी निसर्गाची अवकृपा झाली. आता शासनाने क्षतीग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सुभाष अडकिणे यांनी शासनाकडे केली आहे.
