
९.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
*********
वसमत :
*********
वसमत शहरालगत असलेल्या आसेगाव रोड भागात पोलिसांनी केलेल्या वाहन तपासणीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला असून वाळूसह ९.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २९ गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोली जिल्हयात अवैध वाळू उपसा व वाहतुक रोखण्यासाठी महसूल विभाग व पोलिस विभागाचे पथक कार्यरत करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांची पथके कार्यरत असून पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.
दरम्यान, वसमत तालुक्यातील वाळूघाटावरून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शंकर हेंद्रे यांच्या पथकाने गुरुवारी ता. २९ पहाटे एक वाजल्यापासून वाहनतांची तपासणी सुरु केली होती. यावेळी आसेगाव रोडवर एका हायवाची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली.
पोलिसांनी चालकाची अधिक तपासणी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कैफ फारूखी (रा. वसमत) यांच्या सांगण्यावरून वाळू वाहतूक करण्यात आल्याचे चालक शेख जावेद (रा. वसमत) याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हायवा व वाळू असा ९.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जमादार हेंद्रे यांच्या तक्रारीवरून शेख जावेद, कैफ फारुखी याच्या विरुध्द गुरुवारी ता. २९ पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहेत.
