
वसमत शहर पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमत शहरात एका टाटाएस वाहनातून पोलिसांच्या पथकाने एक लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी एका व्यक्ती विरुध्द शुक्रवारी ता. २२ वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुटखा कोठून खरेदी केला होता याची तपास घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील खंदारे पेट्रोलपंप ते शहरात येणाऱ्या मार्गावर एका टाटाएस वाहनामधून गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, जमादार सय्यद इम्रान, अजय पंडीत यांच्या पथकाने मध्यरात्री वाहनांची तपासणी मोहिम हाती घेतली होती.
यामध्ये पोलिसांनी एका टाटा एस वाहना चालकाची चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांना पाहताच तो घाबरून गेला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नांव गणपत काळे (रा. कुरुंदा) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात चार पोत्यांमध्ये बांधलेल्या पुठ्याच्या बॉक्समध्ये राजगी परंपरा असे नांव असलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा व वाहन असा ४.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी जमादार अजय पंडीत यांच्या तक्रारीवरून गणपत काळे याच्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, जमादार काशीनाथ भोपे पुढील तपास करीत आहेत. सदर गुटखा कोणत्या शहरातून विक्रीसाठी आणला होता याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.
