
भरदिवसा घडलेल्या घरफोडीच्या घटनेने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण, शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
——————–
प्रतिनिधी :
——————–
वसमत येथील श्रीनगर भागात भरदिवसा शिक्षकाचे घर फोडून दागिने व रोख रक्कम पळविल्याची घटना गुरुवारी ता. ७ घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील श्रीनगर भागात पवन शर्मा यांचे घर आहे. पवन हे औंढा नागनाथ तालुक्यातील एका शाळेवर शिक्षक आहेत. नेहमी प्रमाणे सकाळीच शाळेत गेले होते. तर त्यांची आई व पत्नी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलुप लाऊन बाहेर गेल्या होत्या. यावेळी घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाट फोडून त्यातील दागिने व रोख रक्कम पळविली. यावेळी चोरट्यांनी घरातील साहित्याचीही नासधुस केली.
दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पवन यांच्या आई व पत्नी बाहेरून घरी आल्यानंतर घराचे कुलुप तुटलेले दिसले. त्यामुळे घरात चोरी झाल्याची शंका आल्याने त्यांनी तातडीने घरात डोकावून पाहिले असा घरातील साहित्या अस्ताव्यस्त पडलेले दिसले तर कपाटही उघडले दिसले. त्यांनी सदर प्रकार पवन यांना कळविला. तसेच वसमत शहर पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार काशीनाथ भोपे, शेख नय्यर, प्रशांत मुंढे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या सोबतच ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. तर या घटनेत दोन तोळे सोने व १० हजार रुपये चोरट्यांनी पळविल्याची प्राथमिक माहिती पोलिसांंनी दिली आहे.
भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरीकांमध्ये भीती
शहरातील गजबजला भाग असलेल्या वसमत शहरातील श्रीनगर मधे भरदिवसा घरफोडीची घटना घडली. यापुर्वीही दुचाकीस्वार चोरट्यांनी भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविल्याची खळबळजनक घटना घडल्या आहेत. शहरात भरदिवसा वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरीक, महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
