
वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
——————-
प्रतिनिधी :
——————-
मुथूट मायक्रोफिन लिमिटेड कंपनीच्या संपर्क अधिकाऱ्याने वसमत येथे गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ८ खातेदारांकडून ७५ हजार रुपये हडप केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २३ रात्री उशीरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथे मुथूट मायक्रोफिन लिमिटेड कंपनीची शाखा आहे. या शाखेमार्फत बचत गटांना ग्रुप गॅरंटी वर ५० ते ८० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. त्यानंतर या कर्जाची महिन्याचे हप्ते पाडून वसुली केली जाते. याकामी कंपनीकडून संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदर संपर्क अधिकारी गावात जाऊन त्या गटांतील महिलांकडून कर्जाचे हप्ते वसूल करून त्याची गटाकडे असलेल्या शेरा रजिस्टरला नोंद करुन वसूल झालेली रक्कम कंपनीकडे जमा करतात.
दरम्यान, या कंपनीचे संपर्क अधिकारी करण साळवे (रा. परभणी) याने ८ खातेदाराकडून मागील सात महिन्यापासून ७५ हजार रुपयांचे हप्ते जमा केले. मात्र सदर रक्कम कंपनीकडे जमा केली नाही. या शिवाय शेरा रजिस्टरला त्याची नोंदही केली नाही. त्यानंतर कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी कर्ज थकीत प्रकरणात गावात जाऊन चौकशी केली असता महिलांनी वेळेवर कर्जाचे हप्ते करण याच्याकडे दिल्याचे सांगितले. मात्र त्याने कंपनीकडे पैसे भरलेच नसल्याचे उघड झाले. पैसे खात्यात जमा झाले नसल्याने संबंधित महिलांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी कंपनीने करण याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा संपर्कच होत नसल्याने अखेर शाखा व्यवस्थापक रमाकांत तोटावाड यांनी वसमत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी करण साळवे याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाडक, जमादार गजानन भोपे, महेश अवचार पुढील तपास करीत आहेत.
