संतप्त मतदारांकडून तक्रारींचा पाऊस, घर एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात
——————–
प्रतिनिधी :
——————-
वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवार ता. १० उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक ठरला असला तरी मतदार यादीच्या संदर्भात असंख्य तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल झाल्या आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली अंतिम करण्यात आलेल्या मतदार यादीत घर एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात अशी अनेकांची परिस्थिती करुन ठेवली आहे. माजीमंत्री तथा शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ जयप्रकाश मुंदडा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन करीत यादी दुरुस्तीची मागणी केली. यावर श्री माने यांनी मतदारांच्या लेखी तक्रारी स्विकारुन मतदार यादी दुरुस्तीबाबत पाठपुरावा करतो असे सांगितले.
वसमत नगर परिषदेच्या इतिहासात कधी घडला नाही असा महाप्रताप मतदार यादीच्या घोळामधून समोर आला आहे. प्रारुप यादीपर्यंत ठिक असलेली मतदार यादी निवडणूक कार्यक्रम लागण्याच्या काही तास आधी प्रसिद्ध करण्यात आली. प्रसिद्ध झालेली अंतिम यादीने इच्छुक उमेदवारांसह मतदारांची झोप उडाली. जन्मापासून असलेला अनेक मतदारांचा प्रभाग बदलला गेला. घर एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात अशी परिस्थिती निर्माण झाली. यादी प्रसिद्धीनंतर मतदारांना आक्षेप घेण्यासाठी १२ दिवसांचा कालावधी दिला जातो. मात्र आक्षेपासाठी एकही दिवसांचा कालावधी दिला गेला नाही. त्यामुळे एवढया मोठया प्रमाणात असलेल्या मतदारांच्या तक्रारी निवडणूक विभाग कसा सोडवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी इच्छुक उमेदवारांसह इतर प्रभागात वळविण्यात आलेल्या मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांची भेट घेऊन मतदार यादीचा घोळ समोर ठेवला. प्रभाग बदलण्याची मागणी अर्ज दिल्यानंतर नगर परिषद अधिकारी स्थळ पाहणी करुन प्रभागाची खात्री करुन घेतात. त्यानंतर प्रभाग बदलण्यात येतो. मग प्रभाग बदलण्याबाबत कोणाचाच अर्ज नसताना, स्थळाची खात्री केली नसताना प्रभागात बदल कसा झाला हा प्रश्न निर्माण होतो. यावेळी माजीमंत्री तथा शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ जयप्रकाश मुंदडा यांनी कार्यकर्त्यांसह निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांची भेट घेतली. सदरील मतदार यादीचा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे सांगून मतदार यादीत चुका करणार्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी केली तसेच नाहक प्रभाग बदललेल्या मतदारांची पुनश्च त्यांच्या प्रभागात नोंद करावी असे सांगितले. यानंतर प्रभाग बदललेल्या असंख्य मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी तर, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे इमेल द्वारे तक्रार करुन मतदारयादी दुरुस्तीची मागणी केली आहे. वसमत नगर परिषदेच्या इतिहासात मतदार यादीमध्ये झालेला हा सर्वात मोठा घोळ असल्याचे नागरीक बोलून दाखवत आहेत.


